धक्कादायक घटना... घरातलं सामान संपल्याचं का सांगितलं नाही; पुण्यात सावत्र आईकडून लेकीची हत्या
पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून सावत्र आईने केलेल्या बेदम मारहाणीत एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी सावत्र आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरगाव येथे रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मायलेकी पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव येथे राहण्यास आहेत. तेथील शिवशंभू सोसायटी येथे त्या राहतात. “घरातील साहित्य संपले असल्याचे अगोदर का नाही सांगितले”, या रागात आईने लाकडी बांबू आणि लाकडी फळीच्या तुकड्याने मुलीला बेदम मारहाण केली.
या मारहाणीत मुलीला हाताला, पायाला, पाठीवर तसेचं डोक्याला मार लागला. तसेच तिच्या छातीवर हाताने व पायाने देखील आईने मारहाण केली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने मुलीचा मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आईने मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, दवाखान्यात खोटी माहिती देत शासकीय रुग्णालयात आणि पोलिसांना मुलीच्या मृत्यूबाबत दिशाभूल केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा आधिक तपास वाकड पोलीसांकडून करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. नेहमी खून, दरोडा अशा घटना समोर येत आहेत. या गुन्हेगारीला आळा बसणे अत्यंत गरजेचं आहे. क्षुल्लक कारणाहून आईने मुलीची हत्या केली.
या घटनेनं समाजात चुकीचा संदेश जात असून रागाला आळा घालणं देखील तितकेच गरजेचे आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईला ताब्यात घेण्यात आले असून रागाच्या भरात आईने हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
0 Comments