सांगोला तालुक्यातील अचकदाणीच्या सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव मंजूर
अचकदाणी (ता. सांगोला) ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम विजय पाटील यांच्यावरील अविश्वास ठराव दोन विरुद्ध सात मतांनी मंजूर झाला आहे. सांगोला तालुक्यातील अचकदाणी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीने सर्व नऊ जागांवर विजय मिळवला होता. एकहाती सत्ता मिळविल्यानंतर सरपंचपदी पूनम पाटील यांची निवड झाली होती.
सरपंच पूनम पाटील या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीचे कामकाज चालवत नाहीत. मासिक सभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सरपंच या नात्याने उद्धटपणे उत्तर देतात.
ग्रामसभेत एखादा महत्त्वाचा ठराव संमत होताना त्रास देऊन मनमानीपणे वागतात. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक कामात वारंवार अडथळा निर्माण करतात. ग्रामपंचायतीचा हिशोब व्यवस्थित ठेवला जात नाही आदी कारणावरून ९ पैकी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच पूनम पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता.
या अविश्वास ठरावावर मंगळवारी तहसीलदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी ग्रामसेविका सुषमा मोरे, मंडलाधिकारी बी. एन. कदम, तलाठी ए. बी. नटवे यांचेसह सरपंच पूनम पाटील, उपसरपंच शिवाजी चव्हाण, सुनंदा गंभिरे, रेश्मा मोरे, मिनाज मुलाणी, रेश्मा जावीर,
विमल बुधावले, राधाबाई कोळेकर व ब्रह्मदेव खरात असे ९ सदस्य उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठरावावर हात वर करून मतदान घेण्यात आले. अविश्वास ठरावाच्या बाजूने ७ मते पडली. तर विरोधात सरपंच पूनम पाटील यांच्यासह केवळ दोनच मते पडल्याने हा अविश्वास ठराव २ विरुद्ध ७ मतांनी मंजूर झाला.


0 Comments