खळबळजनक... फौजदाराने थेट न्यायालयालाच धमकावले, तडकाफडकी निलंबन !
पोलिसांची दादागिरी अनेकदा पाहायला मिळत असते पण आता तर एका पोलीस अधिकाऱ्याने थेट न्यायालयालाच धमकावण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेने पोलीस दलात आणि न्यायालयीन वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.
न्यायदेवतेचा सगळेच आदर करीत असतात आणि तो करायलाही हवा आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्याना आणि काही कर्मचाऱ्यांना आदराने बोलणे जमत नाही पण न्यायालयापुढे अदबीनेच वागत असतात. गुन्हेगाराशी वेगळे वर्तन करीत
काही पोलिसांना दादागिरीने बोलण्याचीही सवय लागलेली असते. त्यामुळे सामान्य नागरिकांशी बोलतानाही त्यांचे उद्धट वर्तन दिसून येते. पोलीस खात्यात अत्यंत चांगले अधिकारी, कर्मचारी आहेत परंतु काहींच्या बेताल वर्तनाने इतरांनाही बदनाम होण्याची वेळ येत असते.
गुन्हेगार, नागरिक यांच्याशी अरेरावीने वागणे काही नवे नाही पण, या दादागिरीची मजल थेट न्यायमूर्तीपर्यंत गेल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. न्यायालयाच्या घरी जाऊन त्यांना धमकाविण्याचे अजब धाडस एका पोलीस अधिकाऱ्याने केल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
गडचिरोलीच्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या दरम्यान माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण झाली होती. याप्रकरणी चामोर्शीचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले. हे मारहाण प्रकरण भलतेच गाजले होते
आणि लोक संतापलेले होते. याच प्रकरणात पोलीस निरीक्षक खांडवे यांनी न्यायाधीशांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करून हुज्जत घातली. बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पहाटेच या पोलीस निरीक्षकाने माजी सभापती अतुल गण्यारपवार आणि एका उमेदवारास पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते.
यावेळी या दोघांना खांडवे यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर माजी सभापती अतुल गण्यारपवार यांनी पोलिसात तक्रार देखील केली होती. परंतु पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद केला नाही त्यामुळे ते न्यायालयात गेले होते.
प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी मेश्राम यांनी या प्रकरणी म्हणणे ऐकून घेतले आणि पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधास्न कलम २९४, ३२४ आणि ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आपल्यावर गुन्हा दाखल होत आहे हे समजल्यावर पोलीस निरीक्षक चांगलेच संतापले.
न्यायालयाच्या कुठल्याही आदेशावर फार तर वरिष्ठ न्यायालयात दाद मागता येते. याची माहिती असली तरी पोलीस निरीक्षकाने तसे केले नाही. उलट सदर अधिकारी थेट न्यायाधीशांच्या बंगल्यावर पोहोचला आणि तेथे जाऊन त्यांनी न्यायमुर्तींशी हुज्जत घातली.
असभ्य भाषा वापरत शिवीगाळ केली. न्यायाधीशांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशांना याबाबत माहिती कळवली आणि नंतर पोलीस ठाण्यात देखील आपली तक्रार केली. या तक्रारीवरून पोलीस निरीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना निलंबित देखील करण्यात आले.
कायद्याचे सगळे ज्ञान असतानाही एखाद्या पोलिसाने असे कृत्य करावे हे धक्कादायक मानले जात आहे. सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे अनेक प्रकार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून घडतात
पण, थेट न्यायाधीशांच्या बंगल्यावर जाऊन, त्यांना शिवीगाळ करण्याचे धाडस या अधिकाऱ्याने केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, न्यायाधीशांशी असे वर्तन असेल तर सामान्य नागरिकांशी कसे वर्तन केले जात असेल याचा सहज अंदाज येत आहे.


0 Comments