सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; नेत्यांचा मेळ लागेना, मतदारांना काही कळेना!
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी लक्षवेधक ठरत आहे.
या निवडणुकीसाठी विविध पक्षांतील नेत्यांनी एकत्र येत आघाडी, युती तयार केल्या आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
परिणामी या निवडणुकीमध्ये 'नेत्यांचा मेळ लागेना, मतदारांनाही काही कळेना!' अशीच अवस्था निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
तालुक्यातील सहकारी सूतगिरणी व खरेदी विक्री संघाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यानंतर आता सर्वच पक्षांचे व प्रमुख नेत्यांचे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लक्ष लागले होते.
या बाजार समितीची उलाढाल मोठी आहे. त्यामुळे समितीवर वर्चस्वासाठी सर्वांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. विधानसभेनंतर तालुक्यातील बदललेली राजकीय परिस्थिती बदलली आहे.
शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत ही निवडणूक ताकतीने लढविणार असल्याचे सांगितले.
तर सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाने ही निवडणूक लढविण्याचे ठरवून तयारीला लागण्याचे आदेशही दिले होते.पूर्वी नेत्यांनीच दिलेल्या आदेशमुळे अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेण्यास नकार दिला.
त्यातच शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी आपले पॅनलच स्वतंत्रपणे बनवुन सत्ताधारी शेकापमध्ये जणू फूटच पाडली.
या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांची साथ मिळाली. त्यामुळे त्यांच्या हातात आरपीआय, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेही हात दिला.
पक्षापेक्षा नेत्यांच्या आघाड्या झाल्याचे या निवडणुकीत दिसून येऊ लागले आहे. सध्या प्रचार व गाठीभेटीचा जोर वाढला असला तरी या नव्या युती, आघाडींमुळे कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षांपेक्षा नेत्यांचीच युती अन् आघाडी एकीकडे सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे पाटील यांच्याशी युती केली. ते पॅनेल तयार करून निवडणूक लढवीत आहेत.
दुसरीकडे शेकापचेच जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी स्व. गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव गायकवाड यांनी साथ दिली.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी परिवर्तन आघाडीसोबत असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. झपके हे सत्ताधारी आघाडीत असल्याचे दिसत आहेत.
आरपीआय व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना परिवर्तन आघाडीत सामील झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पक्षापेक्षा नेत्यांचीच आघाडी व युती झाल्याचे दिसून येत आहे.
0 Comments