सांगोला तालुक्यातील संगेवाडी ग्रामसचिवाच्या मनमानी कारभाविरोधात ग्रामपंचायत
सदस्यांनीच टाळे ठोकून 'बेमुदत ताळेबंद' आंदोलन
सांगोला : संगेवाडी येथील ग्रामसचिवाच्या मनमानी कारभाराबाबत येथील ग्रामपंचायतीस सरपंचासह कही ग्रामपंचायत सदस्यांनीच टाळे ठोकून 'बेमुदत ताळेबंद' आंदोलन केले.
ग्रामव्यवस्थेच्या कणा समजणारे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक व नागरिकांनी निवडून दिलेल्या सदस्यांमध्ये व्यवस्थित गाव कारभार करण्यासाठी समन्वय असावा लागतो. परंतु संगेवाडी येथे ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराबद्दल येथील सरपंचासह सदस्यांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकले.
ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेविका सतत गैरहजर असतात, कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नाहीत, मासिक सभा व ग्रामसभेतील झालेल्या ठरावाची अंमलबजावणी दप्तरी वेळेवर केली जात नाही,
मोठ्या प्रमाणात निधी येऊनही कामे केली जात नाहीत, ग्रामसभेची सूचना नोटीस बोर्डवर प्रसिद्धी दिली जात नाही, ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय फंडातून झालेल्या कामांना भेटी न देता, गुणवत्तेबाबत पाहणी न करताच बिले अदा केले जातात.
अशा विविध तक्रारी करत या अगोदर गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या बदलीबाबत निवेदन दिले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांचा तात्पुरता चार्ज काढून घेण्याचे आदेश दिला असतानाही त्यांनी इतरांना चार्ज दिला नाही.
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही ठोस कारवाई करत नसल्याने गावच्या सरपंचासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीस कुलूप लावून 'ताळेबंद आंदोलन' सुरू केले आहे.
या ताळेबंद आंदोलनावेळी सरपंच नंदादेवी वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य अनुराधा खंडागळे, रेश्मा खंडागळे, समाधान होवाळ,
सुभाष पाटील दामोदर वाघमारे, प्रभाकर पवार, रविंद्र खंडागळे, चंद्रशेखर वाघमारे, विलास खंडागळे, शिवाजी होवाळ, गणेश खंडागळे, नागेश नष्टे, सुदर्शन खंडागळे इत्यादी ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
माहिती घेऊन कारवाई केली जाईल -
या प्रकरणात सविस्तर माहिती घेतली जाईल. यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्यामार्फत चौकशी केली जाईल. संपूर्ण सत्यता पडताळून योग्य कारवाई करण्यात येईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
ग्रामसेविका विश्वासात न घेता कामकाज करीत असतात. वेळेवर कामे होत नसल्याने नागरिकांना याचा त्रास होत असतो. याबाबत निवेदन दिले असून त्यांची त्वरीत बदली करावी याबाबत आम्ही ग्रामपंचायतीस टाळेबंद आंदोलन केले आहे -
नंदादेवी वाघमारे (सरपंच, संगेवाडी).
ग्रामपंचायत सदस्यच विश्वास घेत नाहीत. कार्यारंभ आदेश न घेताच कामे करीत असतात. पावत्या न देता बिले काढण्यासाठी दबाव आणला जातो
- आर्चना केंदुळे (ग्रामसेविका, संगेवाडी).
बापू, जरा इकडेही लक्ष द्या..!-
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी आणत आहेत.
परंतु निधीचा वेळेवर व योग्य विनियोग होत नसेल तर लोकांना काय फायदा? अशा समन्वया अभावी नागरिकांना त्रास होत असताना सामान्य नागरिक 'बापू जरा इकडेही लक्ष द्या !' असे आवर्जून बोलत आहेत.
0 Comments