google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अलिप्त, सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज?

Breaking News

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अलिप्त, सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज?

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अलिप्त


सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज?

सोलापूर: दोन वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात दाखल होऊन पक्षाच्या सोलापूर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतलेले आणि संपूर्ण जिल्ह्यात झंजावात निर्माण केलेले 

अकलूजचे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे अलिकडे काही महिन्यांपासून पक्षात फारसे सक्रिय दिसत नाहीत.

पक्षाचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात गुजरातच्या सूरत न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा, 

त्यापाठोपाठ रद्द झालेली खासदारकी अशा सा-या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशभर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ संघर्ष करीत आहेत. 

सोलापुरातही जिवात जीव आणून काँग्रेसजन आंदोलन करीत असताना डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील या साऱ्या आंदोलनांपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेत असल्यामुळे हा राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय झाला आहे.

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या या अलिप्ततावादामागे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या तथा प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी असलेल्या मतभेदांचे कारण मानले जात आहे. पक्षाच्या तालुका पातळीवर पदाधिकारी नियुक्त करताना

 शिंदे व प्रणिती यांच्याकडून झालेला हस्तक्षेप आणि त्यातूनच प्रदेश पक्षश्रेष्ठींनी डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या तालुका पदाधिकारी नियुक्त्यांना दिलेली स्थगिती यामुळे मोहिते-पाटील कमालीचे नाराज आहेत. 

म्हणूनच त्यांनी पक्षाच्या बांधणीसह सर्व कामांकडे पाठ फिरविल्याचे म्हटले जाते. केवळ काँग्रेस पक्षच नव्हे तर स्वतःच्या जनसेवा संघटनेच्या कार्याकडेही धवलसिंह मोहिते-पाटील हे काणाडोळा करीत असल्याचे दिसून येते.

अलिकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रात अकोला येथे धवलसिंह मोहिते-पाटील सहभागी झाले होते. त्यानंतर मात्र ते पक्षाच्या व्यासपीठावर फारसे दिसत नाहीत. राहुल गांधी यांना मानहानी खटल्यात सूरत न्यायालयाने दोषी ठरवून सुनावलेली शिक्षा आणि लगेचच 

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी त्यांची खासदारकी तडकाफडकी रद्द केल्यानंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. इकडे सोलापुरात पक्षाची ताकद घटत असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे सत्र आरंभले आहे. 

आमदार प्रणिती शिंदे यांचाही या आंदोलनात सहभाग दिसत असताना हे आंदोलन केवळ सोलापूर शहरापुरते सीमित राहिले आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये मोहोळ व करमाळा भागाचा अपवाद वगळता राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ

 आणि मोदी सरकारच्या विरोधात पक्षाचे आंदोलन होताना दिसत नाही. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील , कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व अन्य पदाधिकारी कोठेही आंदोलनात उतरल्याचे पाहायला मिळत नाही. 

या परिस्थितीत जिल्ह्यातील पक्षाचे नेतृत्व सक्रिय होण्याच्या दृष्टीने लक्ष घालण्यास प्रदेश पक्षश्रेष्ठींस सवड मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती आणखी दयनीय होत असल्याचे दिसून येते.

गेल्या आठवड्यात प्रदेश पक्षश्रेष्ठींनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आणि मोदी सरकारच्या विरोधात पत्रकार परिषदा घेतल्या असता सोलापुरात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेची जबाबदारी पार पडली. 

त्यावेळी काँग्रेस भवनात बागवे यांच्या सोबत धवलसिंह मोहिते-पाटील दिसले. एवढाच अपवाद वगळता धवलसिंह पुन्हा फिरकले नाहीत. जिल्हा ग्रामीणमध्ये आंदोलनाचा कृती कार्यक्रमही दिसत नाही. 

त्यामुळे जिल्हा ग्रामीण भागातील पक्षकार्यकर्ते अस्वस्थ आहेत जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांना कोण सक्रिय करणार ? सुशीलकुमार शिंदे हे पुढाकार घेणार का ?

अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आणि दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र असलेले धवलसिंह मोहिते-पाटील यांना आजही मोहिते-पाटील घराण्याचे म्हणून वलय कायम आहे. 

प्रतापसिंह हयात असतानाच त्यांच्या शेवटच्या काळात ते ज्येष्ठ बंधू विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यापासून दुरावले होते. त्यांच्या पश्चात मोहिते-पाटील घराण्यातील ही फूट आज तेवढीच तीव्र दिसून येते. 

लोकसभा निवडणुकीपासून ते ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर पंचायत, साखर कारखाना आदी प्रत्येक निवडणुकांमध्ये या घराण्यातील संघर्ष पाहायला मिळतो. 

याच घराण्यात चुलते विजयसिंह यांच्या विरोधात म्हणून धवलसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंत अनेकांनी मदत केली आहे.

 धवलसिंह यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दिले खरे; पण नेतृत्वाचे लगाम दुसऱ्यानेच काढून घेतल्यामुळे धवलसिंह यांची नाराजी यापूर्वीच उघड झाली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस अस्तित्वहीन होत 

असताना पक्ष सावरण्याची आत्यंतिक गरज आहे. परंतु त्याबद्दलचे गांभीर्य पक्षश्रेष्ठींना वाटत नाही. निदान सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचे राजकारण केवळ 

सोलापूर शहरापुरते मर्यादित असल्यामुळे जिल्हा ग्रामीणमध्ये काँग्रेसला कोणी वाली दिसत नाही. जिल्ह्यात २०१४ नंतर भाजपने मोठे वर्चस्व निर्माण केले आहे. सध्या खेडोपाड्यांमध्ये भाजपने सावरकर गौरवयात्रा काढून स्वतःची ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून सूक्ष्म नियोजन होत असताना याउलट जिल्ह्यात काँग्रेस कमकुवत झाल्याचे चित्र बघायला मिळते.

Post a Comment

0 Comments