ब्रेकिंग! संजय राऊत यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमी चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यावर ते अधिक आक्रमक झाले आहेत.
ते रोज शिंदे गटाचा समाचार घेत आहेत. दरम्यान संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शीत झालेल्या एका घटनेतील अल्पवयीन, अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर
केल्याप्रमाणे राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बार्शीत गेल्या काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. खळबळजनक प्रकार म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन आरोपींनी संबंधित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर मोठा हल्ला केला होता.
त्यानंतर पोलिसांनी लगेच अक्षय माने, नामदेव दळवी या दोन आरोपींना अटक केली होती. परंतु या संदर्भात ट्वीट करताना राऊत यांनी या प्रकरणातील आरोपी मोकाट असल्याचे सांगितले होते. राऊत यांनी पीडित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक फोटो देखील शेअर केला होता.
राऊत यांनी या केलेल्या प्रकारामुळे अल्पवयीन व अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर झाली, अशी तक्रार एका व्यक्तीने बार्शी पोलिसात दिली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी काल रात्री अकरा वाजता राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


0 Comments