google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्राध्यापकाची आत्महत्या, चिठ्ठीमुळे डॉक्टर पत्नी अडचणीत !

Breaking News

प्राध्यापकाची आत्महत्या, चिठ्ठीमुळे डॉक्टर पत्नी अडचणीत !

     सोलापूर जिल्ह्यातील घटना... प्राध्यापकाची आत्महत्या, चिठ्ठीमुळे डॉक्टर पत्नी अडचणीत !

 जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या प्राध्यापक कैद्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या एका चिट्ठीमुळे त्याची डॉक्टर असलेली दुसरी पत्नी गोत्यात आली असून या डॉक्टर पत्नीच्या विरोधात या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोहोळ तालुक्यात खुनेश्वर येथील प्राध्यापक राहिलेल्या वैभव कालिदास मगर याने शेतात झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. 

वैभव मगर हा जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर गावी आला होता. वैभव मगर याचा विवाह मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील सीमा मोठे यांच्यासोबत २००९ साली झाला होता.

 त्यानंतर आपली पत्नी सीमाचा खून केल्याप्रकरणी वैभव याच्या विरोधात २०१६ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला २०२० मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. येरवडा कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना १३ जानेवारी रोजी तो पॅरोलवर गावी आला होता.

 तामलवाडी पोलीस ठाण्यात हजेरी देऊन येतो म्हणून तो २६ जानेवारी रोजी गेला तो परत आलाच नाही. जेवायला येतो म्हणून त्याने आईला फोन केला परंतु प्रत्यक्षात तो घरी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी मात्र शेतात चिंचेच्या झाडाला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले होते. 

वैभवचा मृतदेह झाडाला लटकताना पाहून त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाची तपासणी करण्यात आली.

 यावेळी वैभवने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून आपल्या खिशात ठेवली होती. ही चिट्ठी पोलिसांच्या हाती लागली. या चिट्ठीत त्याने आपली दुसरी आणि डॉक्टर असलेली पत्नी जबाबदार असल्याचे म्हटले होते त्यामुळे नरखेड येथील डॉक्टर प्रियंका मोटे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 वैभवच्या आईने याबाबत पोलिसात तक्रार दिली असून चिट्ठीत आत्महत्येबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. आपल्या आत्महत्येस आपली दुसरी डॉक्टर पत्नी प्रियंका मोटे हीच जबाबदार असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

 असा स्पष्ट उल्लेख या चिट्ठीत असल्याने पोलिसांनी डॉक्टर पत्नी प्रियंका मोटे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वैभव याची आई निर्मला कालिदास मगर यांनी याबाबत फिर्याद दिली असून वैभव याने दुसरे लग्न केले असल्याबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हते असे आईने म्हटले आहे. 

सदर आत्महत्या केल्याचे घटनेने मोहोळ तालुक्यात आधीच खळबळ उडाली होती परंतु आता या चिट्टीतील मजकूर समोर आल्याने आणि डॉक्टर पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख चिट्ठीत आढळून आल्याने पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments