पंढरपूर विश्रांतीसाठी मामाच्या गावी गेलेल्या पंढरपूर पोलीस अधिकाऱ्याचे निधन !
विश्रांतीसाठी म्हणून गेलेल्या पंढरपूर येथील पोलीस उप निरीक्षकाचे मोहोळ तालुक्यात निधन झाले असून नुकतीच त्यांना उप निरीक्षक पदावर बढती मिळाली होती. या घटनेने पंढरपूर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक युवराज कृष्णा भालेराव यांना अलीकडेच उप निरीक्षक पदावर बढती मिळाली होती. बढतीवर ते मंदिर समिती पोलीस ठाण्यात काम करीत होते.
पंढरपूर येथील रहिवासी असलेले ५६ वर्षे वयाचे युवराज भालेराव हे विश्रांतीसाठी म्हणून दोन दिवसांसाठी मामाच्या गावाला, मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे गेलेले होते. मलिकपेठ येथे गेले असताना ते लघुशंकेसाठी म्हणून गेले आणि परत येत असताना त्यांना अचानक चक्कर आली. चक्कर येताच ते खाली कोसळले.
त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुगणालयात उपचारासाठी हलविण्यात आले परंतु दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यांचा मुलगा चेतन भालेराव यांनी मोहोळ पोलिसात या घटनेची खबर दिली
असून मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत. पंढरपूर येथे ही दुख:द बातमी पोहोचली तेंव्हा पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना धक्का बसला. हृदयविकाराच्या धक्क्याने पोलीस उपनिरीक्षक युवराज भालेराव यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे.
पोलीस खात्यांतर्गत नुकत्याच देण्यात आलेल्या बढत्यामध्ये युवराज भालेराव यांना पोलीस उप निरीक्षक पदावर बढती मिळाली होती. त्यांच्या पश्चात दोन अविवाहित मुले आणि पत्नी असा परिवार आहे.


0 Comments