शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शकतेने करावीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सोलापूर : शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कामे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळमळीने तसेच वेळेत व पारदर्शकतेने करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
केंद्र शासनामार्फत दि. १९ ते २५ डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार,तहसिलदार अंजली मरोड,तहसिलदार दत्तात्रय मोहाळे,नायब तहसिलदार आर.व्ही.पुदाले,बालाजी बनसोडे,माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे,केशव शिंदे तसेच अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.शंभरकर म्हणाले, सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात आलेल्या नागरिकांची कामे तळमळीने, निष्ठेने व पारदर्शीपणे केल्यास सुशासन सप्ताह राबविण्याची गरजच शासनास पडणार नाही.
आपण ज्या कार्यालयात काम करतो तेथे जे अधिकारी आपणांस मिळाले आहेत,त्यांच्या मार्गदर्शनाचा योग्य वापर करून सर्वसामान्यांची कामे तात्काळ मार्गी लावावीत.प्रत्येक काम मुदतीत पूर्ण करावे.तसेच तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करावे,असे त्यांनी यावेळी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले,सुप्रशासन हा चर्चेचा विषय नसून यावर तात्काळ कृती करण्याची गरज आहे.सर्वांनी नियोजनबध्द पध्दतीने कामकाज करावे.येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे काम आपलेच काम आहे असे समजून केल्यास कोणाचीही कामे प्रलंबित राहणार नाहीत.कामेच प्रलंबित राहिली नाहीत तर तणाव देखील येणार नाही.
निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार म्हणाल्या,कर्मचाऱ्यांनी मान्यवरांनी दिलेल्या तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कामे केल्यास आपल्या जिल्ह्यामध्ये नक्कीच सुप्रशासन निर्माण होईल.जिल्ह्यात सुप्रशासन निर्माण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी माजी जिल्हाधिकारी श्री.मवारे यांनी काम करताना येणाऱ्या अडचणी,त्यावर करावयाचे उपाय याबद्दल सोदाहरण मार्गदर्शन केले.तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकच्या कामामुळे जो ताण तणाव जाणवतो या तणावापासून आपल्याला कसे दूर राहता येईल याबद्दलचे सविस्तर असे मार्गदर्शन केशव शिंदे यांनी केले.
शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार कामकाज करावे. तसेच कामाचा निपटारा करण्याकरिता नवनवीन उपाययोजना राबवाव्यात. शासकीय कार्यालयामध्ये कामाकरिता येणारे सर्वसामान्य नागरिक समाधानाने परत गेले पाहिजेत, असे तहसिलदार मरोड यांनी सांगितले. तसेच, या सुशासन सप्ताहामध्ये कोणती कामे होणे अपेक्षित आहे याबद्दलची माहिती त्यांनी यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली.


0 Comments