मिरजेत तरूणाचा दगडाने ठेचून खून; दोघांना अटक,
मिरज शहरातील सांगलीकर मळा परिसरात निर्जन ठिकाणी ऋषिकेश बाळासाहेब जाधव (वय 25, रा. घोरपडे वाडा, मिरज) या रिक्षा चालकाचा दोघा मित्रांनीच दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मिरज शहर पोलिस केवळ दोन तासातच खुनाचा छडा लावून दोघा हल्लेखोरांना अटक केली.
अक्षय विश्वनाथ पिसाळ (वय 28, रा. कमानवेस माळी गल्ली, मिरज) दीपक संजय हलवाई (वय 27, रा. हलवाई गल्ली, मिरज) अशी अटक केलेल्या
संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी ऋषीकेशचा मावसभाऊ शंतनू कोडग याने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, सांगलीकर मळ्यातील एका निर्जन ठिकाणी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना निदर्शनाला आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजीव झाडे आणि गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक नितीन सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
ऋषिकेश जाधव याचा चेहरा पूर्णपणे ठेचला असल्याने ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. जाधव याच्या खिशात मिळालेला मोबाईल आणि त्याच्या कपड्यावरून मिरज शहर पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेऊन जाधव याची ओळख पटवली.
जाधव हा भाड्याची रिक्षा चालवत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. तसेच शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने ऋषिकेशचा खून कोणी व कशासाठी केला, याचा शोध सरू केल्यानंतर ऋषिकेश हा मंगळवारी दुपारी अक्षय व दीपक या मित्रांसोबत दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती मिळाली.
तिघेही मंगळवारी सायंकाळी सांगलीकर मळा परिसरात मद्यपान करण्यासाठी गेले होते. यावेळी ऋषिकेश याने दारूच्या नशेत अक्षयला शिवीगाळ केली. त्यामुळे अक्षय आणि ऋषिकेश या दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. अक्षय याने ऋषिकेशच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर दोघेही मोटारसायकलवरून पलायन केल्याची माहिती मिळाली.
यानंतर पोलिसांचे पथके तयार करून संशयितांचा मागावर रवाना करण्यात आली. मिरज शहर गुन्हे प्रकटीकरणचे सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने अक्षय पिसाळ याला सुभाषनगर येथून तर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रशांत निशानदार यांच्या पथकाने दीपक हलवाई याला अंकली येथून ताब्यात घेतले.


0 Comments