google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंदच!

Breaking News

महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंदच!

 महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंदच!

सोलापूर सीमा भागातील तणाव आजही कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यांतील एसटी सेवा बंदच आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱया दररोजच्या 1 हजार 156 पैकी 382 एसटी फेऱया रद्द केल्या आहेत.

नांदेड, धाराशीव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिधुंदुर्ग या जिह्यातून कर्नाटक राज्यात दररोज एसटी बस जातात. कोल्हापूरातून निपाणी-बेळगाव मार्गे जाणाऱया सुमारे 572 एसटी फेऱया आहेत. त्यापैकी 312 फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत. 

तसेच गडहिंग्लज, चंदगड, आजरा, तळ कोकण व गोवाकडे जाणाऱया बस फेऱया निपाणी ऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. सांगलीतून कर्नाटकात जाणाऱया 60 पैकी 22 फेऱया स्थानिक प्रशासनाच्या सुचनेनुसार रद्द केल्या आहेत. अन्य विभागातील संवेदनशील मार्गावरील 48 फेऱया रद्द केल्या आहेत.

आज सकाळी सहाच्या सुमारास एसटी बस सुरू केली होती. पण दहाच्या सुमारास कर्नाटक पोलीस प्रशासनाने बसेस सोडू नका, असे सांगितले. त्यामुळे सेवा बंद केली. कर्नाटकातून येणारीही बस सेवा बंद आहे. पुढील आदेश येईपर्यंत महाराष्ट्र-कर्नाटक बस वाहतूक बंद राहील, असे कोल्हापूर विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले.

भाविकांच्या बसेसला संरक्षण

बेळगाव जिह्यात श्रीक्षेत्र सौंदत्ती येथे यात्रा सुरू आहे. कोल्हापूरातून 7 हजार भाविकांना घेऊन 145 एसटी बस गेल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत भाविक सुखरूप कोल्हापूरात परत येतील यासाठी कर्नाटक पोलीस प्रशासनाने बससेवा संरक्षण देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती एसटी विभागाने दिली आहे.

श्रीदत्तजयंती निमित्त श्रीक्षेत्र गाणगापूर येथे मोठी यात्रा सुरू आहे. एसटी महामंडळाकडून सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर मार्गावर जादा गाडय़ा सोडल्या आहेत. तेथे कोणताही अडथळा नसून यात्रा सुरळीत सुरू आहे.

राज्यभरात तीव्र पडसाद

कर्नाटक बँकेच्या फलकाला काळे फासले

नाशिक - कन्नडिगांच्या गुंडगिरीचा स्वराज्य संघटनेने नाशिकमध्ये जोरदार निषेध केला. कॅनडा कॉर्नर परिसरातील कर्नाटक बँकेच्या फलकाला या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी काळे फासले.

या आंदोलनात स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर, आशिष हिरे, प्रमोद जाधव, सुभाष गायकर, भारत पिंगळे, सागर जाधव, वैभव दळवी, शुभम देशमुख, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोतकर, किरण डोके, अर्जुन पाटील, संजय तुपलोंढे, पुंडलिक बोडके आदी सहभागी झाले होते.

तर तुमच्याही गाडय़ा फोडू

रत्नागिरी - महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद चिपळूण तालुक्यातील उमरोली गावात उमटले.

 उमरोलीतील युवासैनिकांनी गावात आलेली कर्नाटकची मालवाहतूकीची गाडी अडवून त्यावर जय महाराष्ट्र लिहून ती गाडी कर्नाटकला पाठवली. आज आम्ही गाडी फोडत नाही आहोत पण तुम्ही जर महाराष्ट्राच्या गाडय़ा फोडल्यात तर तुमचीही इकडे लोकं आहेत. 

तुमच्याही गाडय़ा महाराष्ट्रात येतात. त्या गाडय़ा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा युवासेनेचे उपतालुका युवाधिकारी प्रितम वंजारे यांनी दिला आहे.कर्नाटकातून सिमेंट घेऊन आलेली गाडी अडवून त्या गाडीवर शिवसैनिकांनी भगवा झेंडा फडकावला. 

तसेच गाडीच्या काचेवर भगव्या अक्षरात जय महाराष्ट्र लिहून कर्नाटकला एक इशारा दिला आहे. यावेळी उपतालुका युवाधिकारी प्रितम वंजारे, माजी विभागप्रमुख विक्रम साळूंखे, विभाग अधिकारी शुभम मोरे उपस्थित होते.

कानडी बसच्या चाकरीला महाराष्ट्र पोलीस

संभाजीनगर - मिंधे सरकारच्या लाचारीची हद्द झाली असून, युवा सेनेने काळे फासताच चक्क कानडी बसच्या चाकरीला महाराष्ट्र पोलीस जुंपण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संभाजीनगर येथे खास पोलीस बंदोबस्त देऊन कर्नाटकची बस शहराबाहेर काढण्यात आली.

 कर्नाटकातून संभाजीनगरात बस रात्री मुक्कामी येतात आणि याच बस सकाळी कर्नाटकात परत जातात. पहाटे 5.30 वाजता युवासैनिकांनी बसस्थानक गाठून कानडी बसला काळे फासले. युवासैनिकांच्या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. युवासैनिकांनी घोषणाबाजी करून बसस्थानक डोक्यावर घेतले.

Post a Comment

0 Comments