बेकायदा सावकारीला कंटाळून फळविक्रेत्याची आत्महत्या, 'सावकार' डॉक्टरावर गुन्हा दाखल होणार !
उपचार करून रुग्णांना जीवदान देणाऱ्या एका डॉक्टरासह तिघे जण भलतेच गोत्यात आले असून एका आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता न्यायालयानेच दिले आहेत.
पंढरपूर शहरात खाजगी सावकारीने आजवर अनेकांचे प्राण घेतले आहेत आणि अमर्याद व्याज घेणारे बेकायदेशीर सावकार गलेलट्ठ होत आहेत. बेकायदा सावकारीचा कर्करोग सगळीकडेच असून गरिबांना हा रोग पुरता उधवस्त करीत आहे.
गरिबांची गरज असते म्हणून ते सावकारी पाशात अडकतात आणि पुन्हा त्यांची यातून कधीच सुटका होत नाही त्यामुळे ते थेट आपले जीवन संपवत यातून मुक्ती मिळवतात. पंढरपूर शहरात बेकायदा सावकारीचा पाश वर्षानुवर्षे पसरलेला आहे
आणि अधूनमधून याच पाशात गुदमरून गरिबांचे जीव जात आहेत. बेकायदा सावकारीला कंटाळून आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे या आधीही समोर आली आहेत पण आता थेट एका डॉक्टरचेही नाव यात आले आहे.
पंढरपूर येथील संत पेठेत राहणारे गरीब फळ विक्रेते यलप्पा पांडुरंग घुले यांनी २४ एप्रिल २०२२ रोजी आपल्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिट्ठी लिहून ठेवली होती आणि त्यात पंढरपूर येथील एक डॉक्टर आनंद गायकवाड (संत पेठ), विजय शहाणे (इसबावी, सह्याद्रीनगर) आणि सतीश मारुती रोकडे (अनिल नगर) यांची नावे नमूद केली होती.
या तिघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिट्ठीत लिहिले होते. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या चिट्ठीत ही नावे असल्यामुळे पोलिसांनी सदर तिघांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करायला हवा होता
परंतु तसे न घडल्याने कुटुंबीय अस्वस्थ होते. स्थानिक पोलिसांकडे दाद मागून काहीच फायदा झाला नाही म्हणून त्यांनी वरिष्ठांकडे आर्जव केले. पोलिसांनी मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल केलाच नाही.
व्यवसाय करण्यासाठी मयत घुले यांनी डॉ. गायकवाड यांच्याकडे साडे पाच तोळे सोने गहाण ठेवून दरमहा ६ टक्के व्याजदराने ७० हजार रुपये घेतले होते. विजय शहाणे याच्याकडून १० तर रोकडे याच्याकडून २० हजार रुपये दरमहा १० टक्के व्याजदराने घेतले होते. या रकमेची परतफेड घुले यांनी वेळोवेळी केली.
त्यानंतर आपले सोने परत मागण्यासाठी घुले हे मार्च महिन्यात डॉ. गायकवाड यांच्याकडे गेले असता त्यांनी सोने परत देण्यास नकार दिला आणि आणखी ४ लाख ७० हजार रुपये येणे बाकी असल्याचे सांगितले.
शहाणे याने १ लाख तर रोकडे यानेही २ लाख येणे असल्याचे सांगितले. या रकमेसाठी घुले यांना विविध प्रकारे त्रास देण्यात येवू लागला. शारीरिक मानिसक त्रास तसेच धमक्या यामुळे घुले यांनी २४ एप्रिल २२ रोजी गळफास घेतला.
सुसाईड नोट असतानाही गुन्हा दाखल होत नाही यात पोलिसांचीही काही बाजू असण्याची शक्यता आहे पण मयत घुले यांच्या कुटुंबीयांनी, पोलीस दखल घेत नाहीत
हे पाहून थेट न्यायालयात दाद मागितली. अँड. अमोल देसाई यांच्यामार्फत पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खाजगी सावकारयांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला.
या प्रकरणात सुनावणी घेवून न्यायालयाने डॉक्टर आनंद गायकवाड, विजय शहाणे आणि सतीश रोकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंढरपूर शहर पोलिसांना दिले आहेत.न्यायालयाचा आदेश असल्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागणार आहे.


0 Comments