google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी घटना..विद्युत मोटार सोडताना शॉक लागून बाप लेकासह चौघांचा मृत्यू !

Breaking News

दुर्दैवी घटना..विद्युत मोटार सोडताना शॉक लागून बाप लेकासह चौघांचा मृत्यू !

 दुर्दैवी घटना..विद्युत मोटार सोडताना शॉक लागून बाप लेकासह चौघांचा मृत्यू !

 नदीच्या पाण्यात विद्युत मोटार सोडताना बाप लेकासह चौघांचा विजेचा  शॉक लागून जागीच मृत्यू होण्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज घडली आहे. 

शेतकरी सतत कुठल्या ना कुठल्या संकटाला तोंड देत असतो आणि एक संकट टाळले की दुसरे संकट उभे असते. दिवसा वीज मिळत नाही म्हणून रात्रीच्या वेळेला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी देत रात्रभर जागत असतो

 आणि नेमक्या याचवेळी पिकात सर्पदंश होवून त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देताना आजवर कित्येक शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. आज तर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील  निगडे गावात  वेगळीच धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना घडली आहे.

 एकाच वेळी चार जणांचा मृत्यू होण्याच्या या घटनेने पुणे जिल्हा हादरून गेला आहे.  नदीच्या पाण्यात विद्युत मोटार सोडण्याचे काम केले जात असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि चार जणांचा मृत्यू झाला आहे.  

गुंजवणी नदीच्या पाण्यात बंधारा बॅकवॉटरमध्ये पाण्याची मोटार टाकण्याचे काम सुरु होते.  

निगडे येथील  विठ्ठल सुदाम मालुसरे (वय ४५), सनी विठ्ठल मालुसरे (वय २६), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३६) आणि आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय ५५)  हे विठ्ठल मालुसरे यांची मोटार टाकण्याचे काम करीत होते. चौघेजण मिळून मोटार पाण्यात ढकलत असतानाच पाण्यात विजेचा प्रवाह आला आणि त्यामुळे चौघानाही विजेचा जोरदार धक्का बसला. 

हा धक्का एवढा प्रभावी होता की विजेचा धक्का बसताच चौघेही जागीच मृत्युमुखी पडले. शेजारच्या शेतात काम करीत असलेल्या एका शेतकऱ्याच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यांनी विजेचा प्रवाह बंद केला पण तोपर्यंत सगळे संपले होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विठ्ठल मालुसरे आणि सनी मालुसरे यांच्यात वडील आणि मुलाचे नाते होते. 

ही दुर्घटना घडण्याआधी सहा वेळा वीज गेलेली होती अशी माहिती सांगितली जात आहे. दुर्घटना घडल्यानंतर महावितरणचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा सुरु केला.हा प्रकार नेमका कुणाच्या चुकीमुळे घडला याचा तपास सुरु करण्यात आला असून या घटनेने गावावर मात्र शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments