ग्रामपंचायतीसाठी ऑफलाइन अर्जही चालणार, अर्ज भरण्याची मुदत वाढवली
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीत इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इच्छुकांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगातर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. एकाच वेळी असंख्य उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जात असल्याने आयोगाच्या वेबसाइटवरून अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत.
त्यामुळे राज्यातील हजारो उमेदवार काल रात्रीपासून खोळंबले आहेत. 2 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. एक तर ऑफलाइन अर्ज स्वीकारा किंवा ऑनलाइन अर्जासाठीची मुदत वाढ द्या, अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. अखेर राज्य निवडणूक आयोगाने यासंबंधीची महत्त्वाची घोषणा केली आहे.
निवडणूक आयुक्तांची माहिती
विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे..
तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली.
मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.
त्यानुसार दि.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, असे राज्य निवडणूक आयुक्तांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मागील दोन दिवसांपासून राज्यभरातील ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांना निवडणूक अर्ज भरण्यासाठी अडचणी येत होत्या.मात्र ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल करण्याची मुदत : 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
अर्ज छाननी : 05 डिसेंबर
अर्ज मागं घेण्याची तारीख : 7 डिसेंबर
मतदान : 18 डिसेंबर
मतमोजणी आणि निकाल : 20 डिसेंबर
0 Comments