सांगोला लॉजच्या नावाखाली तालुक्यात अनैतिक व्यावसाय बोकाळला ;
देहव्यापार चालणाऱ्या लॉजवर पोलीस केव्हा कारवाई करणार ?
सांगोला तालुका/प्रतिनिधी ;तालुक्यातील अनेक लॉजवर लाजलज्जा खुंटीला टांगून अनैतिक व्यवसाय बोकाळत चालला असून , विनासायास उपलब्ध होणाऱ्या या लॉजमुळे तालुक्यातील युवापिढी वाममार्गाने भरकटत चालल्याचे दिसत आहे
.सांगोला तालुक्यातील अनेक लॉज हे बेकायदेशीर असून , केवळ अनैतिक कारणांसाठीच या लॉजचा वापर होताना दिसत आहे . त्यामुळे पोलिसांनी अशा बेकायदेशीर लॉजची झाडाझडती घेण्याची गरज आहे.
गेल्या काही वर्षांत या भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायाची वाढ झाली आहे. यापैकी काही हॉटेल्स आणि लॉज ही प्रतिष्ठित आणि नामवंत आहेत .
या लॉजनी आपला लौकीक चांगल्याप्रकारे सांभाळला आहे . मात्र , शहर व तालुक्यात असेही काही लॉज आहेत की ज्यांचा वापर केवळ आणि केवळ अनैतिक व्यवसायांसाठीच केला जातो आहे.
अशा लॉजवर रात्रं - दिवस चोरीछुपे येणाऱ्या संशयास्पद जोडप्यांचा वावर आढळून येतो. लॉजवर येणाऱ्या ग्राहकांकडे ओळखपत्र असणे सक्तीचे आहे . मात्र , केवळ अनैतिक कारणांसाठीच वापरण्यात येत असलेल्या या लॉजवर ' आव जाव घर तुम्हारा ' असा मामला आढळून येतो .
यापैकी काही लॉजवर चोरीछुपे तर काही लॉजवर राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालतो , हे आजपर्यंत अनेकवेळा चव्हाट्यावर आलेले आहे .
याशिवाय ' प्रेमाचे रंग उधळण्यासाठी प्रेमीयुगुले लॉजचा आसरा घेत आहेत.अनैतिक व्यवसायासाठी वापरण्यात येत असलेले अनेक लॉज हे बेकायदेशीर आहेत . लॉज चालू करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या १९ शासकीय परवानग्या लागतात .
त्यामध्ये पालिका अथवा ग्रामपंचायत , पोलिस , जिल्हा आरोग्य अधिकारी , वाहतूक पोलिस , अन्न आणि औषध प्रशासन , प्रदूषण नियंत्रण मंडळ , अग्निशामक दल , महावितरण , रस्ते विकास महामंडळ इत्यादींचे ' ना हरकत ' दाखले व अन्य शासकीय परवान्यांचा समावेश आहे .
मात्र , अनैतिक व्यवसायासाठी वापरण्यात येत असलेल्या अनेक लॉजकडे या परवानग्या नसल्याचे आढळून येते . त्यामुळे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आणि युवा पिढीला वाममार्गाला लावण्यास हातभार लावणाऱ्या अशा लॉजची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची गरज आहे .


0 Comments