सांगोला तालुक्यात जवळा ते घेरडी रस्त्यावरील गावडेवाडी येथे तलवारीने हल्ला पित्याचा खून, मुलगा जखमी !
सांगोला:- जीपची काच फोडून तलवारीने हल्ला करून एकाचा खून करण्यात आला तर या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. खुनाची घटना घडली असली तरी उशिराने हा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे.
पूर्वीच्या वैमनस्यातून जीपची काच फोडून ८ जणांनी मिळून पिता पुत्राला गाडीतून खाली ओढून तलवारीच्या हल्ल्याने पित्याचा खून करण्यात आला तर मयताचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
सांगोला तालुक्यातील जवळा ते घेरडी रस्त्यावरील गावडेवाडी ओढ्याच्या जवळ कालच रात्री ही घटना घडली परंतु सांगोला पोलिसात आज हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६५ वर्षे वयाचे गंगाराम संतू गावडे आणि त्यांचा मुलगा विजय गंगाराम गावडे (वय ३२)
हे जीपमधून निघाले असताना ओढ्याजवळ त्यांची जीप थांबविण्यात आली आणि इतरांनी मिळून त्यांच्या गाडीची काच फोडून त्यांना गाडीबाहेर ओढले. त्यानंतर तलवारीने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात गंगाराम गावडे यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा विजय हा गंभीर जखमी झाला.
सदर प्रकरणी जखमी विजय गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सांगोला पोलीस ठाण्यात आज उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश मुत्याप्पा खांडेकर, अंकुश कड्याप्पा खांडेकर, राजू मुत्याप्पा खांडेकर, शाहुबा बापू खांडेकर, आनंद मुत्याप्पा खांडेकर, बाबा बीरा लवटे, तातोबा खांडेकर, बापू तातोबा खांडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सर्व आरोपी हे सांगोला तालुक्यातील गावडेवाडी येथील आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी जखमी विजय गावडे यांची भेट घेतली आणि घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
0 Comments