शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला लवकरच.., सुप्रिम कोर्टात ‘या’ तारखेला होणार सुनावणी…
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. भाजपच्या मदतीने शिंदे यांनी मुख्यमंत्री पद मिळवले.. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीविरोधात शिवसेनेने लगेच सुप्रिम कोर्टात धाव घेतली.. त्यावर 11 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेता येणार नसल्याचे म्हटले होते..
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता येत्या 20 जुलै रोजी घटनापीठासमोर होणार आहे. त्याच वेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याचा फैसला होणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेने 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दाखल केलेल्या याचिकांसह इतर सर्व याचिकांवर बुधवारी (ता. 20 जुलै) रोजी सुनावणी होणार आहे.. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर या याचिकांची सुनावणी होईल. रमण्णा यांच्यासह न्यायाधीश कृष्णा मुरारी व न्यायाधीश हिमा कोहली उपस्थित असतील.
या याचिकांवर होणार सुनावणी..
शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाचं आव्हान
एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान
विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका
विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशालाही शिवसेनेकडून आव्हान
एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्याला आव्हान
एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि गोगावले यांना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान
महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला गळती लागली आहे.. रोज नवनवे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्वाचा असणार आहे.. त्याच वेळी शिंदे यांचेही राजकीय भवितव्य या निकालावरच ठरणार आहे.. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.


0 Comments