मोठी बातमी : दहीहंडी उत्सवानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर!
मुंबई : कृष्णजन्माष्टमी व गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव देशभरात अतिशय हर्षोल्हासात साजरा करण्यात येतो. या उत्सवाला सांस्कृतिक व पारंपरिक पार्श्वभूमीचा वारसा असल्याने विविध राज्यात उत्सवाचे स्वरूप भव्य असे असते. कोरोना काळात सणासुदींवर घातल्या गेलेल्या निर्बंधांमुळे, गेली दोन वर्षे जनतेला उत्सव निर्बंधाविना साजरे करता यावे याची प्रतीक्षा लागून होती. यावर्षी कुठल्याही निर्बंधाविना सर्व उत्सव राज्यात पार पाडल्या जातील, अशातच शिंदे सरकारने दहीहंडी उत्सवाबद्दल महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काल पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी केली होती की, दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी सोबतच हा उत्सव ‘राष्ट्रीय सण' घोषित व्हावा. सरनाईक यांच्या पत्राची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडी उत्सवाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली. यासंबंधी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः माहिती दिली की, दहीहंडी उत्सवाला सुट्टी जाहीर करावी की नाही याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आतापर्यंत निर्णय घेत होते. परंतु आता दहीहंडी उत्सवाच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टीचे आदेश मी स्वतः राज्याचे मुख्य सचिव यांना देणार असून, याबाबत अंमलबजावणी केली जाईल.
एकंदरीतच यंदाचा दहीहंडी उत्सव केवळ गोविंदा पथकाकरिताच नव्हे तर संपूर्ण जनतेकरिता आनंद द्विगुणित करणारा राहणार असून, सर्वसामान्य लोकांना व्यस्ततेतून सुट्टीमुळे वेळ मिळणार असल्याने, या उत्सवाचा मनमुराद आनंद ते लुटू शकतील, हे नक्की!


0 Comments