प्लॅस्टिक पिशव्यांसह आता ‘या’ वस्तूंवरही बंदी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय..
मोदी सरकारने 1 जुलै 2022 पासून ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’वर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात या निर्णयाची काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ‘सिंगल युज प्लॅस्टिक बंदी’ करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
‘सिंगल युज प्लॅस्टिक’मध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनर आदींच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.. मात्र, त्याच वेळी सध्या बाजारात पेपरच्या नावाखाली डिश, कंटेनर, ग्लास, कप आदी प्लॅस्टिक लेप असलेल्या किंवा प्लॅस्टिक लॅमिनेशन केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.. या सर्व वस्तुंमध्येही ‘प्लॅस्टिक’ आहे.
‘या’ वस्तूंवरही बंदी..
ही बाब लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्लॅस्टिक लेप (Coating) वा ‘लॅमिनेशन’ केलेल्या वस्तूंवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.. प्लॅस्टिक वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेऊन, एकनाथ शिंदे यांनी ‘प्लॅस्टिक बंदी’ नियमांत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘शक्तिप्रदत्त’ समिती नेमण्यात आली आहे. या समितीची 7 जुलैला बैठक झाली. त्यात महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकॉल उत्पादने अधिसूचना-2018 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.
राज्य सरकारने 15 जुलैच्या अधिसूचनेद्वारे प्लॅस्टिक लेप व प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. त्यामुळे डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर आदींच्या उत्पादनावर आता बंदी असणार आहे.
शहरी व ग्रामीण भागात दैनंदिन कचऱ्यातील प्लॅस्टिकचे प्रमाण लक्षणीय आहे. कचरा डेपो, जलाशयांमध्ये हा कचरा फेकला जातो. त्याची पुनर्प्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी जाळला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असल्याने शिंदे सरकारने हा निर्णय घेतला आहे..


0 Comments