सांगली : प्रेमी युगुलाने विष पिऊन सोबत केली आत्महत्या; तरुणीचे ६ दिवसांपूर्वीच झाले होते लग्न!
सांगली : प्रेमी युगुलाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले. अश्विनी गजानन माळी आणि लक्ष्मण संभाजी शिंदे अशी मृत प्रेमी युगुलाची नावे आहेत. एकमेकांना फोन करुन दोघांनीही आपापल्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. मृत अश्विनीचा विवाह सहा दिवसांपूर्वीच म्हणजे 1 जून रोजी झाला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, जत तालुक्यातील एकुंडी येथे ही घटना घडली. अश्विनी गजानन माळी (वय 22 वर्षे, रा. एकुंडी, ता. जत, सध्या रा. सलगरे, ता. मिरज) आणि लक्ष्मण संभाजी शिंदे (वय 21 वर्षे, रा. एकुंडी, ता. जत) या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते.
परंतु लक्ष्मण शिंदे आणि अश्विनी माळे यांचे प्रेमसंबंध कुटुंबियांना मान्य नव्हते. त्यातच अश्विनीच्या कुटुंबियांनी तिचा विवाह सलगरे येथील तरुणाशी करुन दिला. 1 जून रोजी तिचा विवाह झाला. लग्नानंतर ती रविवारी (5 जून) एकुंडी येथे माहेरी आली होती. त्यानंतर सोमवारी (6 जून) सकाळी अश्विनी आणि लक्ष्मण यांनी एकमेकांना फोन करुन आत्महत्या करण्याचे ठरवल्याचे समजत आहे. यानंतर दोघेहि आपापल्या घरी विषारी द्रव्य प्यायले असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी साडेसातच्या दरम्यान अश्विनी आणि लक्ष्मणला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या दोन्ही घटनांची नोंद जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


0 Comments