कोरोना वाढल्याने यंदाही शाळा बंद राहणार.. की चालू ? शिक्षणमंत्र्यांकडून महत्वाचे संकेत..!
गेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोके वर काढलंय. कोरोनाची चौथी लाट येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून नुकत्याच काही सूचना केल्या होत्या. सध्या राज्यात मास्कसक्ती नसली, तरी मास्क वापराबाबत आवाहन केलं जात आहे. कदाचित लवकरच पुन्हा एकदा मास्क सक्तीचाही निर्णय होऊ शकतो..
राज्यात कोरोना हातपाय पसरत असताना, राज्यात 13 जूनपासून शाळा सुरु होत आहेत. मात्र, त्याच वेळी कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने यंदा तरी शाळा सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झालाय. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (रविवारी) महत्वाची माहिती दिली.
त्या म्हणाल्या, की “राज्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलंय. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं असून, कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनामुळे राज्याची चिंता पुन्हा वाढली असली, तरी यंदा शाळा बंद ठेवल्या जाणार नाही. आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ठरलेल्या तारखेला शाळा सुरु केल्या जातील.”
शाळांसाठी ‘एसओपी’ जारी करु..
येत्या 13 जूनपासून राज्यातील शाळा सुरु होत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी ‘एसओपी’ (SOP) जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्क सक्ती करायची की नाही, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नवी कोविड नियमावली जारी करु, असे शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या..
कोरोनामुळे गेली 2 वर्षे शाळा बंद होत्या. त्यामुळं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालंय. यंदा कोरोना संसर्ग वाढत असला, तरी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून नव्या नियमानुसार शाळा सुरु करणार आहोत. कोरोनाबाबत शाळांना खबरदारी घेण्याचे आदेश दिल्याची माहिती मंत्री गायकवाड यांनी दिली..
कोरोना वाढत असल्या, तरी पुन्हा शाळा बंद करणं योग्य नाही.. सध्या मास्क सक्ती नसली, तरी मास्कबाबत पुन्हा एकदा जनजागृती करावी लागणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरावा, असं आवाहन गायकवाड यांनी केलं.


0 Comments