सांगोला नगरपरिषदेने 'माझी वसुंधरा' अभियानात पटकावला राज्यात 6 वा क्रमांक
पर्यावरणाबाबत जागरूक सांगोलकरांचं हे यश :- मुख्याधिकारी कैलास केंद्रे
सांगोला (प्रतिनिधी): राज्य शासनाद्वारे 16 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंच तत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान 2.0 हे शासनाचे महत्वाकांक्षी अभियान राज्यभर अमृत शहरे, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायती स्तरावर राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील एकूण 226 नगरपरिषदांच्या गटामध्ये सांगोला नगरपरिषदेने राज्यात 6 वा क्रमांक पटकावला आहे.
राज्य शासनाद्वारे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, पर्यावरणाची होत असणारी हानी रोखण्यासाठी माझी वसुंधरा अभियान सुरु करण्यात आले. या अभियानात पृथ्वी, जल, वायू, अग्नी आकाश या पंच तत्वांवर आधारित घटकांवर आधारित राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. सांगोला नगरपरिषद देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. या अभियानात सांगोला नगरपरिषदेमार्फत वसुंधरा लीग, वसुंधरा फेस्ट, सायकल रॅली, इ बाईक रॅली,
शहरातील शाळा व महाविद्यालये यामध्ये पर्यावरणासंबंधी विविध स्पर्धांचे आयोजन, वसुंधरा दूतांच्या निवडी यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या पप्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन, स्वतः च्या मालकीची 14000 वृक्ष क्षमतेच्या नर्सरी ची निर्मिती शहरातील अतिक्रमण करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवर हरित पट्टे निर्मिती करण्यात आली. शहरातील विविध भागांमधील हवेचे दरमहा हवा परीक्षण, घनकचरा व्यवस्थापन,विहिरींचे
पुनर्भरण / सौदर्यीकरण, जलप्रदूषण टाळण्यासाठी “निर्माल्य ते निसर्ग उपक्रम, सर्व शासकीय इमारतीमधील पाणी व ऊर्जा परीक्षण, सर्व सार्वजनिक इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. तसेच शहरातील नागरिकांमध्ये पाणीबचत, विजबचत, अपारंपरिक ऊर्जा, इ- कचरा विलगीकरण, फटाकेबंदी व पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यास प्रोत्साहन यासारख्या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
माझी वसुंधरा अभियानाची तत्वे दर्शवण्यासाठी शहरात ई- बाईक कट्टा, सोलार ट्री, वसुंधरा ट्री, वसुंधरा सर्कल, वेस्ट टू बेस्ट कॉर्नर यासारख्या नाविन्यपूर्ण व उत्तम अशा प्रतिकृतीची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लागून शहराच्या सौदर्यात देखील भर पडली.
सदर अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी सांगोले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, अभियान नोडल अधिकारी स्वप्निल हाके, तसेच विविध घटकांतर्गत पथकप्रमुख तुकाराम माने, तृप्ती रसाळ, विजयकुमार कण्हरे, जितेंद्र गायकवाड, अभिराज डिंगणे, विनोद सर्वगोड, शिवाजी सांगळे, अमित कोरे, योगेश गंगाधरे, लाईटमन कृष्णा मोरे व नगरपरिषद कर्मचारी तसेच पर्यावरण दूत, शहरातील सुजाण नागरिक याचे मोलाचे योगदान लाभले.
हे यश प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, पत्रकार बंधू-भगिनी, सुजाण नागरिक, शाळा-कॉलेज चे गुरुजन वर्ग, विदयार्थी अश्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात सुरू झालेली पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ यापुढे आणखी प्रभावी करण्याचा मानस आहे.
कैलास केंद्रे
मुख्याधिकारी, सांगोले नगरपरिषद
0 Comments