धक्कादायक : अनैतिक संबंध , भाच्याने आत्याचा खून करून जाळला मृतदेह
रायगड: नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नागोठणे येथे घडली आहे. अनैतिक संबंधातून , वारंवार होत असलेल्या पैशाच्या मागणीमुळे भाच्याने आपल्या आत्याच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची घटना नागोठणे करकरणी मंदिर परिसरातील डोंगराळ भागात घडली आहे. भाच्याने पुरावा नष्ट करण्यासाठी आत्याच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.
दीपाली गणपत शिद असे मयत महिलेचे नाव आहे. विजय लक्ष्मण शिद असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी विजय याला अटक केली आहे. एल अँड टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाच्या सावधानतेने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. विजय याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
आरोपी विजय आणि मयत महिलेचे अनैतिक संबंध होते. दोघेही नात्याने भाचा आणि आत्या होते. मयत महिला ही भाच्याकडून वारंवार पैशाची मागणी करीत असे आणि त्याला मारहाण करीत होती. त्यामुळे विजय याच्या मनात राग निर्माण झाला त्यामुळे आत्याचा काटा काढण्याचे त्याने ठरविले.
3 एप्रिल रोजी या गुन्ह्यातील आरोपी विजय (22) हा यामाहा मोटार सायकलवर मयत आत्याला घेऊन आला होता. दोघेही करकरणी मातेच्या मंदिर परिसरातील डोंगराळ परिसरातील आडगळ भागात गेले होते. याठिकाणी दोघांच्यात वाद झाले आणि जुन्या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपीने महिलेची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या मोटार सायकल मधून पेट्रोल काढून आणून मयत महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून टाकण्यात आले. या घटनेने खळबळ उडाली आहे.
या परिसरात एल एन्ड टी कंपनीचे काम सुरू आहे. याठिकाणी जयेश झासराणी आणि अजून एक सुरक्षा रक्षक तैनात होते. जयेश या सुरक्षा रक्षकाने आरोपी आणि मृत महिलेला पाहिले होते. त्यामुळे त्याला संशय आला होता म्हणून आरोपीच्या मोटार सायकलचा आणि त्याचे फोटो काढून ठेवला होता. डोंगरात धूर दिसल्याने सुरक्षा रक्षक हे त्याठिकाणी पोहचले. त्यानंतर या घटनेचा तपास लागला.
त्यामुळे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. घटनास्थळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी पी आर स्वामी, नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार, रोहा पोलीस निरीक्षक पाटील, वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी भेट दिली. या हत्येप्रकरणी आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास नागोठणे पोलीस करीत आहे.


0 Comments