धक्कादायक : बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
सीसीटीव्ही फुटेज आले समोर
नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवार 5 एप्रिल रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी जवळून गोळ्या घातल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात आणण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील शारदानगर भागात सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान बियाणी कारमधून उतरून घराकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या कारसमोर दुचाकीवर थांबलेल्या दोघांनी उतरून त्यांच्याजवळ येऊन गोळीबार केला. त्यामुळे ते खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्यात गोळ्या लागल्या.
त्यानंतर दोघेही दुचाकीवरून फरार झाले.
बियाणी यांच्यावरील गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. घटनास्थळी पोलिस आले त्याचबरोबर त्यांना खासगी रुग्णालयात तत्काळ गाडीतून आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत गाडीत असलेला चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


0 Comments