पंढरीत पिस्तुलधारी ! काय होता डाव ? पोलीस घेताहेत शोध !
पंढरपूर : पंढरपूर शहरात देशी पिस्तुल घेवून वावरत असलेल्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून या दोघांचा नेमका काय डाव होता याचा शोध पोलीस घेत आहेत.
पंढरपूर शहराला फार मोठी अध्यात्मिक परंपरा आहे तशी मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील आहे. भर दिवसा पंढरीत नंग्या तलवारी नाचत होत्या आणि भर रस्त्यावर दिवसाढवळ्या खून होत होते. टोळीयुद्धाची मोठी झळ पंढरीला बसलेली आहे. पोलिसांच्या प्रयत्नामुळे गेल्या काही वर्षांपासून नाचणाऱ्या नंग्या तलवारी म्यान झाल्या आहेत आणि टोळीयुद्ध शांत झाले आहे असे वाटत असतानाच पुन्हा काही वर्षापासून पंढरीत गुन्हेगारी वाढल्याच्या काही घटना घडल्या.
त्यामुळे पंढरी वरून शांत दिसत असली तरी आतून गुन्हेगारी धुमसत असल्याचे समोर आले. २०१८ साली स्टेशन रोड वरील एका हॉटेलमध्ये नगरसेवक संदीप पवार याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या झाली आणि पंढरीतील गुन्हेगारी पुन्हा गडद झाली. पंढरीच्या गुन्हेगारीत तलवारी म्यान झाल्या आणि त्यांची जागा देशी बनावटीच्या पिस्तुलांनी घेतली असल्याचे दिसून आले.
अलीकडेच पोलिसांनी पिस्तुल घेवून संशयितरित्या फिरत असलेल्या दोघांना पिस्तुलासह अटक केल्याची घटना घडली होती. यावेळी खळबळ उडाली असतानाच आता पुन्हा दोघे जण अशाच प्रकारे आढळले आहेत. देशी बनावटीचे विनापरवाना पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन संशयास्पदरित्या वावरत असलेल्या दोन तरुणांना पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे मैदानाच्या परिसरात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी रात्रीच्या दरम्यान ही कारवाई केली आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
आणि पोलीस पोहोचले !
पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना रेल्वे मैदानाजवळ लोखंडी गेटच्या जवळ कमरेला पिस्तुल लाऊन एक जण थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने आपला मोर्चा रेल्वे मैदानाकडे वळवला. पोलिसांनी कौशल्याने पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथील स्वप्नील अरुण आयरे (सद्या राहणार संभाजी चौक, पंढरपूर) याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे विनापरवाना असलेले एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
दोघांना अटक !
रेल्वे मैदानाजवळ दोघे जण संशयितरित्या वावरत असताना स्वप्नील आयरे याच्याजवळ विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतुसे आढळल्याने त्याच्यासह आणखी एक साथीदार आंबादास सुरेश पाटोळे (वय २२, रा. रमाई नगर, पाण्याच्या टाकीजवळ, पंढरपूर यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पिस्तुल जप्त !
दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडील तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि सहा हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. भारतीय हत्यार कायदा कलम ३, ७, २५ यासह भारतीय दंड विधान कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय डाव होता ?
पिस्तुल घेवून रात्रीच्या वेळेस हे दोघे रेल्वे मैदानाच्या परिसरात कशासाठी वावरत होते ? त्यांचा नेमका काय डाव होता ? सदर पिस्तुल आणि काडतुसे त्यांनी कुणाकडून आणि कशासाठी आणले ? याचा शोध आता पोलीस घेत असून या घटनेने पुन्हा एकदा पंढरीत खळबळ उडाली आहे. जिवंत काडतुसासह पिस्तुल आढळल्याने ते कुणाचा गेम करणार होते काय ? हे देखील पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे.
0 Comments