त्या कर्मचार्यांना सेवेत घेता येणार नाही! : परिवहनमंत्री
मुंबई । दि.11 एप्रिल । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी हल्ला करणा़र्या एसटी कर्मचा़र्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलना दरम्यान अशा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचार्यांना पुन्हा एसटी सेवेत रुजू करणे शक्य नसल्याची माहिती परिवहनमंत्री अॅॅड. अनिल परब यांनी आज दिली.
न्यायालयाच्या निकालानंतरही 105 एसटी कर्मचा़र्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यासंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जे कामगार 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
मात्र शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. 22 एप्रिलपर्यंत कामगार कामावर रुजू न झाल्यास एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण करता येईल का याचा विचार केला जाणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या बसेस पुन्हा सुरू करण्यासाठी आगाराकडून सर्व बसेसची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
0 Comments