शिक्षक आमदार म्हणाले , शिक्षकांना आता 1 तारखेलाच पगार
सोलापूर ः शिक्षकांचे वेतन दरमहा 1 तारखेला व्हावे, यादृष्टीने अनेकदा राज्य स्तरावरून अध्यादेश निघाले. तरीही, शिक्षकांच्या पगारीसाठी विलंब होत असल्याने अनेक शिक्षकांना बॅंकांचे हप्ते भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.आता विलंबाचा प्रश्न कायमस्वरुपी दूर होणार असून सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांना दरमहा 1 तारखेलाच वेतन मिळेल, असा विश्वास शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास 11 हजार शिक्षक असून खासगी प्राथमिक शाळांमध्ये पावणेतीन हजार शिक्षक कार्यरत आहेत. तर माध्यमिक विभागात अंदाजित 14 हजार शिक्षक असून त्या सर्व शिक्षकांसाठी दरमहा 260 कोटींचे वेतन द्यावे लागते. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत अपेक्षित महसूल जमा न झाल्याने शिक्षकांच्या पगारी दरमहा 10 ते 15 तारखेच्या आसपास झाल्या. आता कोरोनाची परिस्थिती सुधारली असतानाही तसाच प्रकार होऊ लागला आहे.
वास्तविक पाहता वित्त विभागाकडून दोन-तीन महिन्यांचे वेतन एकदम ट्रेझरीमध्ये जमा केले जात होते. पण, आता दरमहा वेतनाची रक्कम ट्रेझरीत जमा केली जात असल्याने त्याची पडताळणी, पुन्हा ट्रेझरीकडे बिले पाठविणे, त्यानंतर वेतन अधीक्षकांकडे वेतनाची रक्कम पाठविणे, यामध्ये काही दिवसांचा विलंब होतोय, असे चित्र आहे. पण, आता सीएमपी प्रणालीमुळे पगारीच्या विलंबाची समस्या दूर होईल,
असेही आमदार आसगावकर म्हणाले.शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याच्या हेतूने 23 मार्च रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यात शिक्षकांच्या पगारी दरमहा 1 तारखेला व्हाव्यात, यासंदर्भात तोडगा निघाला आहे. सोलापूर जिल्ह्याची निवड सीएमपी प्रणालीत झाली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पगारीला लागणारा विलंब टळणार आहे.
- जयंत आसगावकर, शिक्षक आमदारसीएमपी प्रणाली अशी आहे...
सध्या शाळांकडून त्यांच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बिले सर्वप्रथम शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेतन अधीक्षकांकडे पाठविली जातात. त्याठिकाणी बिलांची पडताळणी होऊन ती बिले ट्रेझरीकडे पाठविली जातात. त्यांच्याकडून शिक्षकांच्या वेतनाची रक्कम वेतन अधीक्षकांकडे पाठविले जाते. तेथून ती रक्कम संबंधित शिक्षकांच्या बॅंक खात्यात जमा होते.
पण, आता सीएमपी प्रणालीमुळे वेतन अधीक्षकांकडून शिक्षकांच्या वेतनाची बिले ट्रेझरीला गेल्यानंतर तेथूनच थेट बॅंकांमध्ये शिक्षकांचा पगार जमा होणार आहे. राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार असून त्यात सोलापूर जिल्ह्याची निवड झाल्याचेही आमदार आसगावकर यांनी स्पष्ट केले.
0 Comments