शिंदे पिता-पुत्रांना चौथ्या नोटिशीनंतर अटक होणार : तक्रारदार शिवसेना नेत्याचा दावा
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांची आणि त्यांचे पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाल्याचा वृत्ताला आमदार शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, त्याविषयी सविस्तर बोलण्यास नकार दिला आहे. आमदार शिंदे यांची ईडीकडून चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताने सोलापूर जिल्ह्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शिंदे यांच्या विरोधात तक्रार करणारे शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली असून ईडीच्या चौथ्या नोटिशीनंतर शिंदे पिता-पुत्रांना कधीही अटक होऊ शकते, असा दावा केला आहे.
आमदार शिंदे व त्यांच्या मुलांनी साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज काढल्याप्रकरणी माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील शेतकरी हणमंत कदम आणि शिवसेनेनेकडून माढा विधानसभा लढवलेले संजय कोकाटे यांनी ईडीकडे तक्रार केली होती. त्यानंतर ईडीने आमदार शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना नोटीस पाठवली आहे.
त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत या पितापुत्रांची तीन वेळा चौकशी झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे.दरम्यान, ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीबाबत आमदार बबनराव शिंदे यांना विचारले असता त्यांनी ईडीकडून आपली चौकशी झाली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र त्याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.दुसरीकडे, शिंदे पिता-पुत्रांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणारे शिवसेनेचे संजय कोकाटे म्हणाले की, भगवान के देर है, लेकीन अंधेर नही.
विरोधकांवर खोट्या केसेस करायच्या आणि त्यांना बदनाम करायचं. आमदार शिंदे आणि त्यांची सुपुत्र मात्र चोऱ्या करून धर्मात्मा असल्यासारखे वागायचे, हे आता संपलेले आहे. उपळाई बुद्रूक येथील नागनाथ कदम आणि मी ईडीकडे दोन स्वतंत्र तक्रारी केलेल्या आहेत.जादा उसाचा गैरफायदा घेऊन स्वतःचे व्यवसाय उभे करण्यासाठी शिंदे कुटुंबीयांनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर्स घेतले आहेत.
लोकांच्या नावावर खोट्या सह्या करून कर्ज काढायचे. काढलेले हे कर्ज कर्जमाफीमध्ये बसवायचे किंवा ओटीएसमध्ये टाकायचे, अशा प्रकारचा भ्रष्टाचार आमदार बबनराव शिंदे आणि त्यांची मुले रणजित आणि विक्रम शिंदे यांनी केलेला आहे. त्याचा आता कुठेतरी न्याय होण्याची वेळ आली आहे. मी यानिमित्ताने ग्वाही देतो की, प्रसंगी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात कुठेही लढण्याची वेळ आली तरी लढू.
पण शेतकऱ्यांचा पैसा न पैसा, जो शेअर्स, कर्जमाफी असेल तो शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याचा काटेकोर प्रयत्न करण्यात येईल. शिंदे यांना आतापर्यंत तीन नोटिसा आल्या आहेत. आता चौथ्या नोटिशीनंतर कुठल्याही क्षणी या पिता-पुत्रांना अटक होऊ शकते. आम्हाला खात्री आहे की, माढा तालुक्यातील जनतेला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, असेही कोकटे यांनी सांगितले.
0 Comments