भरधाव वेगातील कारला लागली आग आणि --
देवळी : चकचकीत रस्त्यावरून भरधाव वेगाने निघालेल्या कारला अचानक आग लागली आणि काही वेळातच कार संपूर्ण जळून खाक झाली असल्याची थरारक घटना तुळजापूर- नागपूर मार्गावर सेलुसरा शिवारात घडली आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून अजून उन्हाळा तेवढा तापलेला नाही. हळूहळू तापमान वाढू लागले आहे पण धावती वाहने जळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. चाळीस प्रवासी घेवून जाणाऱ्या शिवशाही बसला आग लागून बस जळून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. आणखीही काही घटनात वाहनांना आगी लागलेल्या आहेत. मुलीकडे निघालेल्या एका कुटुंबाची कार भरधाव वेगात असतानाच पेटली आणि आगीने आपले तांडव दाखवले. या थरारक प्रसंगात चालकाने प्रसंगावधान राखले म्हणून सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण गाडीचा प्रवास देखील किती धोक्याचा आहे हे या घटनेने पुन्हा अधोरेखील केले आहे.
होळी सणाच्या निमित्ताने यवतमाळ येथील दुधे कुटुंब कार घेऊन मुलीकडे निघालेले होते. होळीच्या सणाचा उत्साह आणि मुलीच्या होणाऱ्या भेटीचा आनंद यात हे कुटुंबीय गाडीत गप्पा मारत निघाले होते. वेगाने निघालेली ही कार सेलुसरा शिवारातील एका पुलाजवळ आली तेंव्हा कारच्या पुढच्या भागातून आगीचे लोळ उठू लागले असल्याचे चालक सुनील भगत याच्या लक्षात आले आणि तो हादरून गेला. गाडीत चालकासह प्रणय दुधे, जयंत दुधे, विक्की गायकवाड, संजुमाला दुधे, सतिका दुधे हे या कारमधून प्रवास करीत होते. इंजिनाच्या बाजूने एकदम आगीचे लोळ उठू लागल्याने चालक गांगरून गेला परंतु लगेच त्याने प्रसंगावधान दाखवत वेगात असलेली गाडी बाजूला थांबवत गाडीतील सर्वाना खाली उतरवले.
कारला लागलेली आग पाहून सगळे प्रवाशी देखील घाबरून गेले आणि आपला जीव वाचवत ते गाडीच्या बाहेर पडले. ते बाहेर पडण्याच्या अवकाश, गाडीला लागलेल्या आगीने रौद्र स्वरूप धारण केले आणि संपूर्ण कारचा ताबा आगीने घेतला. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा आकाशाच्या दिशेने झेपावू लागल्या. थरारक प्रसंग पाहून परिसरातील नागरिकांनी आणि रस्त्यावरील बघ्यांनी येथे गर्दी केली. तातडीने देवळी येथील अग्निशामक दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने प्रयत्न करून ही आग विझवली परंतु आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना पाउण तास प्रयत्न करावा लागला.
आग विझवली पण --
भर रस्त्यावर हा जीवघेणा आणि थरारक प्रसंग सुरु होता आणि पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकत होता. दुधे कुटुंब सुदैवाने मोठ्या संकटातून वाचले होते आणि त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची कार जळत होती. केवळ २० मिनिटांच्या अवधीत या कारचा अक्षरश: कोळसा झाला होता. अग्निशामक दलाच्या बंबाने पाउण तासांनी आग विझवली असली तरी संपर्ण गाडी आगीत स्वाहा झालेली होती. वाहन चालवताना अपघात होणार नाहीत याची दक्षता तर घ्यावीच लागते पण गाडी धावत असताना इंजिनमधून धूर येतोय काय? याकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून आता उन्हाळ्यात तर याकडे अधिक गंभीरपणे पाहावे लागणार आहे.
0 Comments