वडिलांसोबत नातं न ठेवणाऱ्या मुलीचा संपत्तीत किती वाटा..? सुप्रिम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय..!
भारतात वडिलोपार्जीत संपत्तीवरुन होणारे वाद काही नवे नाहीत.. या वादातून अगदी जवळचे म्हटले जाणारे नातेवाईकही एकमेकांच्या जिवावर उठतात. संपत्तीच्या वादाची कोर्टात अशी किती तरी प्रकरणे आहेत, ‘तारीख पे तारीख..’ करताना अशा कित्येक पिढ्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात बरबाद झाल्या, होत आहेत.
वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटपाबाबत खरं तर कायद्यात स्पष्ट माहिती दिलीय. मात्र, अनेकांना त्याची माहिती नसते.. वडिलांच्या संपत्तीत मुलीचा बरोबरीचा वाटा असतो. पण, मुलीला आपल्या वडिसांसोबत कोणतेही नाते ठेवायचे नसेल तर.. ? मग वडिलांच्या संपत्तीत मुलीला वाटा मिळेल का, असा प्रश्न निर्माण होतो.
दरम्यान, नुकतेच असेच एक प्रकरण सुप्रिम कोर्टासमोर आले होते. त्यात सुप्रिम कोर्टाने स्पष्ट आदेश देताना, हा प्रश्न निकाली काढला.. नेमकं हे प्रकरण काय होतं, नि त्यावर कोर्टाने काय निर्णय दिला, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
नेमकं प्रकरण काय..?
खरं तर हे प्रकरण नवरा-बायकोच्या घटस्फोटाचे आहे.. पतीने बायकोपासून घटस्फोटासाठी जिल्हा न्यायालयात केलेला अर्ज मंजूर झाला होता. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. हायकोर्टाने जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला. नंतर हायकोर्टाच्या निर्णयाला पतीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण आल्यावर मध्यस्थी केंद्राने आधी पती-पत्नीमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.
सुप्रीम कोर्टाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकारला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की पत्नी तिच्या भावासोबत राहते. तिचा आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च पती उचलत आहे. त्यासाठी तो दरमहा तिला 8 हजार रुपये ‘अंतरिम भरण पोषण’ म्हणून देत आहे. पती सर्व दाव्यांप्रमाणे पत्नीला एकरकमी 10 लाख रुपये देऊ शकतो.
वडिलांच्या संपत्तीत मुलीचा किती वाटा.?
दरम्यान, या वादादरम्यानच वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा किती वाटा असेल, हे समोर आले. सुप्रीम कोर्टाने सांगितले, की आईने जर आपल्या मुलीला मदत केली, तर ती रक्कम तिच्याकडेच राहील. मात्र, मुलीला आपल्या वडिलांसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नसल्यास शिक्षण वा लग्नासाठी कोणतीही रक्कम घेण्यास ती पात्र नाही. अशा मुलीचा वडिलांच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही.
मुलगी 20 वर्षांची असेल नि तिला वडिलांसोबत कोणतेही नाते ठेवायचे नसेल, तर तिला संपत्तीत वाटा मागण्याचा कोणताही अधिकार नाही. शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी ती वडिलांकडे पैशांची मागणी करु शकत नाही. न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला..
0 Comments