मुंबई | राज्यात सध्या गृहविभागाच्या कारभारावरून जोरदार राजकारण पेटलं आहे. परिणामी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.
राज्यात पोलिसांचा कसलाही धाक राहिला नाही.अवैध धंद्यांमध्ये राज्यातील पोलीस सहभागी आहेत, असा आरोप विरोधकांसह सत्ताधारी गटाचे आमदार करत आहेत. अधिवेशनात सर्वात जास्त प्रमाणात राज्य पोलीस दलावर टीका होताना दिसतीये. अशातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व आरोपांवर आज उत्तर दिलं आहे.
बीड जिल्हा पोलीस अधिक्षकांना रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच आता आणखीन एक पोलीस अधिक्षक वादात सापडले आहेत. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्यावर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी लेखी तक्रार देखील दिली आहे.
सोलापूर ग्रामीण कार्यक्षेत्रात अवैध गुन्हे वाढले आहेत. वाळू तस्करी, गुटखा, दारू असले धंदे खुलेआम चालू असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तेजस्वी सातपुते गुन्हा दाखल करायला येणाऱ्यांवरच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. परिणामी राज्यात खळबळ माजली आहे.
सातपुते यांनी साताऱ्यात एका व्यापाऱ्यावर मोक्का लागला असताना त्याला सेटलमेंट करून सोडल्याचं राऊत म्हणाले आहेत. सातपुते यांच्यावर अनेक केसेस चालू असल्यानं त्यांना पदावरून दूर करावं, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांना पोलीस विभागातून काढून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी देखील राऊतांनी यावेळी केली आहे.

0 Comments