google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात ‘एसपी’ सातपुतेंचे ‘ऑपरेशन परिवर्तन’; दारू काढणाऱ्या महिला शिवणार आता ‘ब्रँडेड शर्ट’

Breaking News

सोलापुरात ‘एसपी’ सातपुतेंचे ‘ऑपरेशन परिवर्तन’; दारू काढणाऱ्या महिला शिवणार आता ‘ब्रँडेड शर्ट’

 सोलापुरात ‘एसपी’ सातपुतेंचे ‘ऑपरेशन परिवर्तन’; दारू काढणाऱ्या महिला शिवणार आता ‘ब्रँडेड शर्ट’

‘ऑपरेशन परिवर्तन’चा ‘सोलापूर पॅटर्न’ राज्यातील इतर जिल्ह्यांना मार्गदर्शक असून सर्व जिल्ह्यांनी हा उपक्रम राबवावा, असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने यापूर्वीच काढले आहेत.


पुणे : हातभट्टीच्या गावठी दारूच्या उत्पादनासाठी भट्ट्या चालवून दारूची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील सहाशे कुटुंबांना या व्यवसायापासून परावृत्त करून त्यांचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते  यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत उद्या (ता.२१) सोलापूर जवळच्या मुळेगाव तांडा येथील बंजारा समाजातील ४५ महिलांच्या माध्यमातून तयार कपड्यांचा शिलाई उद्योगाची सुरवात होणार आहे.विशेष म्हणजे या महिलांनी शिवलेले शर्ट जपानला निर्यात केले जाणार आहेत.


जे हात वर्षानुवर्षे हातभट्टीची दारू तयार करून विकण्यात गुंतलेले होते. त्यांच्या हातांनी तयार झालेले ‘ब्रँडेड शर्ट’ परदेशात विकले जाणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी या क्षेत्रातील ॲपेक्स गारमेन्टस या कंपनीने घेतली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते उद्या मुळेगाव तांडा येथे या उपक्रमाचे उदघाटन होणार आहे.


सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या उपक्रमाची माहिती ‘सरकारनामा’ला दिली. त्या म्हणाल्या, ‘‘ सोलापूर जिल्ह्यात काम करण्यास सुरवात केल्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारूची माहिती घेतली.त्यातून ‘ऑपरेशन परिवर्तन’ची कल्पना सूचली. तातडीचे कामाला सुरवात झाली. केवळ छापेमारी करणे हा ‘ऑपरेशन परिवर्तन’चा उद्देश नव्हता. छापेमारी, जागृती, समुपदेशन व पूनर्वसन या चतु:सूत्रीच्या आधारे कामाला सुरवात केली.’’


सातपुते म्हणाल्या, ‘‘ सुरवातीला महिन्यातून एकदा दारूभट्ट्यांवर छापे मारण्यास सुरवात केली. मात्र, महिन्यातून एकदा छापा मारून उपयोग होत नव्हता म्हणून दर पंधरा दिवसांनी छापेमारीला सुरवात केली. तरीही दारूभट्टया सुरूच होत्या. त्यानंतर दर तीन दिवसांनी छापे मारण्याचे सत्र सुरू केले. त्यासाठी हातभट्टीची दारू काढणाऱ्या गावाची यादी करून आधिकाऱ्यांना गावे दत्तक दिली. मुळेगाव तांडा हे गाव मी स्वत:कडे घेतले. तीन दिवसांनी छापेमारी सुरू केल्यानंतर दारूभट्ट्याची संख्या कमी झाली. दारूभट्टी चालविणाऱ्या अनेकांवर कारवाई केली. मात्र, केवळ कारवाई करून भागणार नव्हते. या लोकांच्या रोजगाराचे काय हा प्रश्‍न होता.’’


छापेमारी, जागृती, समुपदेशन व पूनर्वसन या चतु:सूत्रीच्या आधारे काम करीत असताना मुळेगाव तांडा येथील दारू तयार करण्याच्या कामात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या ४५ महिलांना दारूचे पुष्परिणाम, या व्यवसायामुळे होणार त्रास आणि कायदेशीर कारवाई याबाबत समुपदेशन केले. त्यातून या ४५ महिला दारू तयार करण्याचा व तो विकण्याचा व्यवसाय सोडण्यास तयार झाल्याचे सातपुते यांनी सांगितले.


सातपुते म्हणाल्या, ‘‘ ‘मिटकॉन’च्या माध्यमातून या ४५ महिलांना ४५ दिवसांचे कपडे शिवण्याचे प्रशिक्षण दिले.या महिला आता उत्तमपणे शर्ट शिवू लागल्या आहेत.सोलापूरमधील ॲपेक्स गारमेंटस् या जपानला कपडे निर्यात करणाऱ्या कंपनीसोबत या ४५ महिला काम करणार आहेत.


ॲपेक्सकडून शर्टसाठी लागणारा कच्चा माल मिळणार आहे. शिवलेले शर्ट रोजच्या रोज ॲपेक्स कंपनी घेणार आहे.या उपक्रमातून प्रत्येक महिलेला रोज किमान तीनशे ते साडतीनशे रूपये मिळणार आहेत. या उपक्रमाची सुरवात उद्या (ता.२१) कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते होणार आहे.’’


या उपक्रमाची ही सुरवात असून अजून बरेच काम बाकी असल्याचे सातपुते यांनी सांगितले. केवळ या ४५ महिला नव्हे तर गावठी दारूवर अवलंबून असलेल्या सहाशेपैकी तीनशे कुटुंबांना शेती, ड्रायव्हिंग, किराणा दुकान, पान टपरी, चहाचे दुकान, वडापाव विक्री तसेच सुतारकाम यासारखी कामे आणि व्यवसाय सुरू करण्यास मदत केल्याचे सातपुते यांनी सांगितले. दरम्यान, ‘ऑपरेशन परिवर्तन’चा ‘सोलापूर पॅटर्न’ राज्यातील इतर जिल्ह्यांना मार्गदर्शक असून सर्व जिल्ह्यांनी हा उपक्रम राबवावा, असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने यापूर्वीच काढले आहेत.

Post a Comment

0 Comments