google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : रस्त्यांवर वाहनांची विनाकारण अडवणूक

Breaking News

सोलापूर : रस्त्यांवर वाहनांची विनाकारण अडवणूक

 सोलापूर : रस्त्यांवर वाहनांची विनाकारण अडवणूक

सोलापूर: रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर महामार्ग पोलिस, आरटीओ, ग्रामीण आणि शहर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. एकाचदिवशी एकाच नियमाखाली त्या वाहनाला अनेकदा दंड झाल्याचीही उदाहरणे आहेत. बेशिस्तांना स्वयंशिस्त लागावी, अपघात व अपघाती मृत्यू कमी होण्यासाठी दंडात्मक कारवाईचा उपाय रास्त आहे. पण, दंड वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या हेतूनेच आता कारवाया सुरू असल्याचे बोलले जात आहे. हजारो कोटींचा दंड वसूल होऊनही अपघातांची संख्या कमी का झाली नाही, असा प्रश्‍न त्यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.


वाहतूक नियम पाळा, हेल्मेट वापरा, सिटबेल्टचा वापर करावा, मद्यपान नकोच, अतिवेगाने वाहन चालवू नका, विरुध्द दिशेने वाहन चालवू नये, क्षमतेपेक्षा अधिक माल अथवा प्रवासी वाहतूक करू नये, लेन कटिंग केल्यास दंड होईल, अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन देऊ नका, अशा विविध मुद्‌द्‌यांवर फोकस करून दरवर्षी वाहतूक जनजागृती अभियान राबविले जाते. दुसरीकडे जिल्ह्यातील अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा समिती आहे. वाहतूक कारवाईत शेकडो कोटींचा दंड दरवर्षी वसूल केला जातो. तरीही, रस्ते अपघात कमी झाले नसून अपघाती मृत्यूदेखील तेवढेच आहेत. काहीवेळा दंडात्मक कारवाई करताना वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यावेळी अपघाताची शक्‍यता असते, तर अनेकदा अपघातही झाले आहेत.


कोरोनामुळे दोन वर्षांपासून बाहेर फिरता आले नसल्याने आता सोलापूर जिल्ह्यात अथवा जिल्ह्यातून अन्य ठिकाणी देवदर्शन किंवा फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पण, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर संबंधित ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांना आठ ते दहा ठिकाणी पोलिसांना सामोरे जावे लागते. सोलापूर जिल्ह्याबाहेरील पासिंग दिसल्यानंतर त्यांना जाणीवपूर्वक अडविण्याचे प्रकारही अनेकदा पहायला मिळतात. अशा कारवायामुळे पर्यटन वाढणार कसे?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


मग, होते वरिष्ठांच्या हप्त्याची चर्चा


बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी अधिवेशनात काही दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांच्या गंभीर मुद्‌द्‌याला हात घातला. त्यांनी थेट पोलिस अधीक्षकांनाच एक ते दीड कोटींचा हप्ता जात असल्याचा आरोप सभागृहात केला. दुसरीकडे ते म्हणाले, काही रस्त्यांची बोली लावून ठराविक अधिकाऱ्यांनाच त्याठिकाणी कारवाईसाठी उभे केले जाते. दरम्यान, कोणत्याही वाहनचालकाला अडवून त्याच्याकडून दंड वसूल करण्याचे प्रकार वाढल्यानेच तसा आरोप झाला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी वाहतूक कारवाईकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.


सोलापूर जिल्ह्यातून १३ महामार्ग जातात. रस्ते चकाचक झाल्याने वाहनांचा वेग वाढला असून अपघातही वाढले आहेत. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहन चालविल्यास निश्‍चितपणे अपघात व अपघाती मृत्यू कमी होतील. नियमभंग करणारी संशयास्पद वाहने अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.


- मनोजकुमार यादव,पोलिस निरीक्षक, वाहतूक, सोलापूर ग्रामीण


वाहतूक पोलिस आणि वाहनचालकाच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा प्रकारची कारवाई कोणीही करू नये. नियम मोडून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांची अडवणूक न करता त्याला ई-चालानद्वारे दंड आकारला जावा. वाटेतच वाहनांची अडवणूक करून कारवाई करणे अपेक्षित नाही.


- दीपक आर्वे, सहायक पोलिस आयुक्‍त (वाहतूक), सोलापूर शहर

Post a Comment

0 Comments