शहाजीबापूंचं माझ्यावर प्रेम आहे; म्हणूनच शिवसेनेत जाण्याचा त्यांचा गेम आहे!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगोल्यात घेतली शिवसेना आमदार शहाजी पाटील यांची भेट
सांगोला (जि. सोलापूर) : ‘शहाजीबापूंचं माझ्यावर प्रेम आहे; म्हणूनच शिवसेनेत जाण्याचा त्यांचा गेम आहे' अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आमदार शहाजी पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या कामांबाबत प्रशंसा करीत शिवसेना व आम्ही सोबत नसलो तरी बापू आणि आम्ही कायम एकत्रच राहू, असे आश्वासन देत राजकीय फटकेबाजी केली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सोमवारी (ता.14 फेब्रुवारी) सांगोला दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. 'युरोपमध्ये रोम आहेत, म्हणूनच शहाजीबापूंचं माझ्यावर प्रेम आहे.
शहाजीबापूंचे माझ्यावर प्रेम आहे, म्हणूनच शिवसेनेत जाण्याचा त्यांचा गेम आहे.' अशी कविता सादर करत ते म्हणाले की, या वेळी विधानसभेत जाण्यासाठी बापूंला आम्ही मदत केली होती. विधानसभेत आल्यानंतर त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी व प्रामुख्याने पाणीप्रश्नासाठी भरीव असे काम केले आहे.
(स्व.) गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे खूप मोठे नेते हेाते. शहाजीबापूही अत्यंत अभ्यासू व तालुक्यासाठी काम करणारे नेते आहेत. त्यांना सांगोलासारख्या मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाली आहे. शिवसेना व आम्ही एकत्रित नसलो तरी शहाजीबापू आणि आम्ही मात्र कायम एकत्रितच राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

0 Comments