महसूल कार्यालयात " सुंदर माझे कार्यालय " अभियान ; १५ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत होणार कार्यालयांचा कायापालट
शासकीय कार्यालयात वातावरण स्वच्छ , सुंदर , पोषक ठेवून अधिकारी , कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यात सुंदर माझे कार्यालय अभियान राबविण्यात येणार आहे . हे अभियान १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२२ अखेर महसूल कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली .
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सदस्यांच्या बैठकीत श्री . जाधव यांनी माहिती दिली . यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार , उपजिल्हाधिकारी ( महसूल ) विठ्ठल उदमले , उपजिल्हाधिकारी ( रोहयो )चारुशिला देशमुख , तहसीलदार मोहाळे , नायब तहसीलदार आर . व्ही . दत्तात्रय पुदाले , महसूल सहायक सलीम शेख आदी उपस्थित होते .
श्री . जाधव यांनी सांगितले की , हे अभियान सहा उपविभागीय कार्यालय , ११ तहसील कार्यालय , मंडळ अधिकारी आणि ४७१ तलाठी कार्यालयात राबविण्यात येणार आहे . अभियानाची तालुका स्तरावरील पूर्वतयारी , अभियानाची रूपरेषा अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे .
यामध्ये तहसीलदार सहअध्यक्ष , निवासी नायब तहसीलदार सदस्य सचिव आणि सदस्य म्हणून मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष , तलाठी संघटनेचे अध्यक्ष , कोतवाल संघटनेचे अध्यक्ष असणार आहेत . तालुकास्तरीय समितीने कामकाजाचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर पुरस्कार निवड समिती स्थापन केली आहे . या समितीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी सहअध्यक्ष असणार आहेत . तहसीलदार ( सर्वसाधारण ) सदस्य सचिव तर सदस्य म्हणून उपजिल्हाधिकारी ( महसूल ) , उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) , तहसीलदार ( महसूल ) आणि जिल्हा माहिती अधिकारी असणार आहेत .
ही समिती गुणांकन करणार असून याद्वारे प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांकासह उत्कृष्ठ काम केलेल्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे . कार्यालय सुंदर असेल तिथल्या सोयी - सुविधा उत्तम असतील तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून याचा प्रशासनाला आणि सामान्य जनतेला लाभ होणार आहे .
प्रत्येक कार्यालयांचे अंतर्बाह्य रूप बदलून प्रशासनाला गती देणे आणि अधिकारी , कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हा अभियानाचा उद्देश आहे . स्वच्छ , पारदर्शी , सुशोभीकरण कार्यालयासोबत इतर कार्यालयीन कामांचाही गुणांकनात समावेश असणार आहे . कार्यालयातील वातावरण नागरिकांसाठी सुलभ आणि कर्मचाऱ्यांसाठी काम करण्यायोग्य , प्रेरक , उत्साहवर्धक राहील , यासाठी प्रयत्न राहणार आहेत .
यामध्ये जिल्ह्यातील काही तलाठी कार्यालयाला स्वत:ची इमारत नाही , तिथे सामाजिक दायित्व निधीतून कार्यालयाचे काम करण्यात येणार आहे , असेही श्री . जाधव यांनी सांगितले .
गुणांकन पद्धतीमध्ये जमीन विषयक अर्धन्यायीक प्रकरणांचा निपटारा , जात प्रमाणपत्राचे कामकाज , विभागीय चौकशीचे प्रकरणे , दप्तर सहा गठ्ठा पद्धत , नोंदवह्या अद्ययावत , फेरफार नोंदी , १०० टक्के कर वसुली , सातबारा १०० टक्के वाटप , अनधिकृत येणे प्रकरणे , बौद्धिक सुविधा , शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्यांचे विषय , ई - पीक पाहणी आदींचा विचार केला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी - जाणार श्रीमती पवार यांनी सांगितले .

0 Comments