मुलाचं अभ्यास न करणं आईच्या जीवावर बेतलं, विवाहितेनं गळफास घेत संपवलं जीवन
मुलानं अभ्यास न करणं किती घातक ठरू शकतं, याचा प्रत्यय नुकताच एका घटनेत आला आहे. मुलानं अभ्यास न केल्याच्या कारणातून झालेल्या वादानंतर पुणे येथील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील एका विवाहित महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहेत. पतीशी वाद झाल्यानंतर संबंधित महिलेनं आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
रोहिणी राकेश थोरात असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. त्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील रहिवासी होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी शुक्रवारी सकाळी मृत रोहिणी आपला मुलगा राघव याचा अभ्यास घेत होत्या. पण राघव काही अभ्यास करत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या रोहिणी यांनी आपला राघव याला मारहाण केली होती. त्यामुळे राघव घरात मोठ्याने रडत होता.
याचवेळी फिर्यादी पती राकेश थोरात कामावरून घरी आले होते. घरात सुरू असलेला प्रकार पाहून त्यांनी आपल्या मुलाची पत्नीच्या तावडीत सुटका केली. अभ्यास न करणाऱ्या मुलाला मारत असताना का आडवलं? यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. या वादानंतर रागावलेल्या रोहिणी यांनी आतल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून घेतला.
यावेळी पती राकेश यांनी दरवाजा उघडण्यासाठी पत्नीला हाका मारल्या पण काहीच उपयोग झाला नाही. रोहिणी यांनी शेवटपर्यंत दार उघडलं नाही. काही वेळाने संशय आल्याने राकेश यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, पत्नी रोहिणी यांनी ओढणीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच पती राकेश थोरात यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.

0 Comments