लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा
डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी बेकायदेशीरपणे काढल्याच्या चारा घोटाळ्याप्रकरणी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांची सीबीआय कोर्टचे विशेष न्यायाधीश एसके शशी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावली. लालू प्रसाद यांना ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या आणखी ३७ जणांना शिक्षा सुनावण्यात येत आहे.
१५ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांच्यासह ३८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर लालू प्रसाद यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. १५ फेब्रुवारी रोजी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरलेल्या ३६ जणांना प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
याशिवाय २४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ याशिवाय कट रचण्याशी संबंधित कलम १२० ब आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले. लालू प्रसाद यांना डोरंडा ट्रेझरी प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली आहे.

0 Comments