डिजिटल फ्रेंडली भिकारी मागतो ऑनलाईन भीक.. सुट्ट्या पैशांच्या समस्येवर शोधला अनोखा उपाय..!
बसस्टॅंड, मंदिरे वा रस्त्यांवर अनेकदा भिकाऱ्यांचे दर्शन होते.. बऱ्याचदा दान-धर्म करण्यासाठी तुम्ही खिशातही हात घातला असेल, तर काही वेळा सुट्टे पैसे नसल्याने इच्छा असूनही तुम्ही निघुन गेला असाल.. पण सुट्ट्या पैशाचा बहाणा बिहारमध्ये नाही चालणार.. कारण इथले भिकारीही डिजिटल झालेत…
ऐकून आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरंय.. बिहारमधील बेतिया रेल्वे स्थानकात तुम्हाला डिजिटल फ्रेंडली भिकारी पाहायला मिळू शकतो.. ‘पाकिटात सुट्टे पैसे नसतील, तर ‘फोन पे’ करा, साहेब..!’ असं म्हणून हा भिकारी तुमच्या समोर चक्क ‘QR CODE’ पुढे करतो.. सध्या हा डिजिटल भिकारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्याची जोरदार चर्चा आहे.
राजू प्रसाद, असं या डिजिटल भिकाऱ्याचे नावं.. वय वर्ष 40.. बेतिया येथील बसवारिया वॉर्ड क्रमांक-30 येथील प्रभूनाथ प्रसाद यांचा एकुलता एक मुलगा.. जन्मानेच गतीमंद.. पोटापाण्याचा दुसरा मार्ग नसल्याने त्याने भीक मागण्यास सुरवात केली. गेल्या तीन दशकांपासून तो रेल्वे स्टेशनवर भीक मागतोय..!
बऱ्याचदा सुट्टे पैसे नसल्याचे सांगून लोक त्याच्यापासून सुटका करुन घ्यायचे.. त्यावर त्याने उपाय शोधला. बेतियाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत त्याने स्वत:चे खाते उघडलं.. सोबतच ई-वॉलेटदेखील तयार केले. आता तो ‘गुगल-पे’, ‘फोन-पे’च्या माध्यमातून भीक मागतो.
आता लोकांनाही सुट्ट्या पैशांची सबब राजूला सांगता येत नाही. त्यामुळे लोक राजूला भीक देतात, पण डिजिटली पेमेंट स्वीकारण्याची पद्धत पाहून अनेकांना हसू आवरत नाही. ऑनलाइन पेमेंटसाठी ‘क्यूआर कोड’ राजूने गळ्यात लटकवले आहे. सुट्टे पैसे नसल्यास तो ऑनलाइन पैसे देण्यास सांगून, क्यूआर कोड पुढे करतो.
पंतप्रधान मोदींचा मोठा भक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजूही मोठा भक्त आहे. मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकायला विसरत नाही. मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’मुळे प्रभावित होऊनच त्याने बँक खाते उघडले. पण, सुरुवातीला त्याला अडचणी आल्या. त्याच्याकडे आधार कार्ड होते, पण पॅनकार्ड बनवावे लागले. नंतर बँकेत खाते उघडले.
स्वत:ला तो लालू प्रसाद यादव यांचा मुलगा म्हणवून घेतो. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लालू प्रसाद यादव यांच्या सर्व कार्यक्रमांना तो हजेरी लावत असे. लालू यादव हेदेखील त्याचे चाहते असल्याचे तो सांगतो. लालू प्रसाद यादव यांच्या सांगण्यावरून 2005 मध्ये त्याला ‘सप्तक्रांती सुपर फास्ट एक्स्प्रेस’च्या पेंट्री कारमधून रोज जेवण मिळायचे. 2015 पर्यंत हे चक्र चालू होते.

0 Comments