कंटेनर चालक " संजय चव्हाण " खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासात पोलिसांनी लावला छडा ; दोन सख्ख्या भावांना अटक
बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून दोघा सख्ख्या भावांसह आणखी तीन अनोळखी इसमांच्या मदतीने कंटेनर चालक खून केल्याचे तपासात उघड !
सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून दोघा सख्ख्या भावांनी तीन अनोळखी इसमांच्या मदतीने कंटेनर चालक संजय भगवान चव्हाण , वय ३० , रा . महमदाबाद , हुन्नूर , ता . मंगळवेढा याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे .
याबाबत पोलीस निरीक्षक सुहास जगताप व तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांनी माहिती दिली आहे.सांगोला पोलिसांनी २४ तासात गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून या खुनातील आरोपी अनिल जकाप्पा पुजारी वय २८ व सुनील जकाप्पा पुजारी वय २७ दोघेही रा.महमदाबाद , हुन्नूर , ता . मंगळवेढा यांना अटक केली आहे .
या खून प्रकरणातील आणखी तीन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत . अज्ञात कारणावरून पाच ते सहा अनोळखी इसमांनी कंटेनर चालक संजय भगवान चव्हाण , वय ३० , रा . महमदाबाद , हुन्नूर , ता . मंगळवेढा या कंटेनर चालकाचे अपहरण करून त्याच्या डोक्यात मारहाण करून खून केला .
तसेच पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने त्याचे प्रेत मोटरसायकलसह उदनवाडी ते चोपडी जाणाऱ्या रोडच्या कडेला दगडामध्ये टाकून दिल्याची घटना घडली होती . भगवान बाबू चव्हाण रा.महमदाबाद ( हुन्नूर ) ता . मंगळवेढा यांनी अज्ञात पाच ते सहा इसमांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती . सांगोला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची वेगाने सूत्रे हलवली होती .
सदर खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्याचे सांगोला पोलिसांपुढे आव्हान होते . मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील , पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर , स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची दोन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती .
दरम्यान तपास अधिकारी सपोनी हेमंतकुमार काटकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महमदाबाद ( हन्नूर ) येथील अनिल जकाप्पा पुजारी वय २८ व सुनील जकाप्पा पुजारी वय २७ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संजय भगवान चव्हाण यांच्या खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासात उलगडा झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास घेतला .
ही कामगिरी पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर , पोलीस नाईक राहुल कोरे , पोलीस नाईक अभिजीत मोहोळकर , पोलीस नाईक दत्ता वजाळे , पोलीस नाईक सचिन वाघ , पोलीस नाईक सिद्धनाथ शिंदे यांनी केली .

0 Comments