google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महापालिकेत राष्ट्रवादीचा कधीच झाला नाही महापौर ! तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा

Breaking News

महापालिकेत राष्ट्रवादीचा कधीच झाला नाही महापौर ! तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा

 महापालिकेत राष्ट्रवादीचा कधीच झाला नाही महापौर ! तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा



सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. त्यावर सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्‍त करीत विजयाचा दावा केला. विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आमच्याच पक्षाची सत्ता येईल 


म्हणण्याऐवजी महाविकास आघाडी झाल्यास भाजपचा निश्‍चित पराभव होईल, असे भाष्य केले.तरीही, राष्ट्रवादीने महापौर आमचाच असा दावा केला असून शिवसेना हा सत्तेसाठी निर्णायक पक्ष ठरेल, असा विश्‍वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.


महापौरपद मिळविण्यासाठी या दोन्ही पक्षाने आघाडीपूर्वीच कॉंग्रेसला कोंडीत पकडण्याचा 'डाव' टाकल्याने कॉंग्रेससमोर 'पेच' निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. महापौर कोणाचा, यावर पुढे नवीन राजकीय समिकरणांची जुळवाजुळव केली जाणार आहे. महापालिकेवर सत्ता कोणाची येईल, याचा अंदाज बांधला जात आहे.


महापालिकेच्या राजकारणात महेश कोठे यांनी स्व. विष्णूपंत कोठे यांचे बोट धरून प्रवेश केला. त्यावेळी पक्षासाठीचे त्यांचे योगदान पाहून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महापालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी कोठे यांच्यावर सोपविली. आमदार प्रणिती शिंदे यांनीही त्यांना साथ दिली.


1992 मध्ये पहिल्यांदा महेश कोठे हे राजकारणात आले आणि पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर ते कधीच मागे हटले नाहीत. महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते झाले. परंतु त्यांची आमदार होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यांनी पक्षाअंतर्गत कुरघोडीचे कारण पुढे करून कॉंग्रेसला हात दाखविला आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महापालिकेचे समिकरण बदलले आणि राष्ट्रवादीला मागे सारून शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला.


आता त्यांनी शिवसेनेचे धनुष्य खाली ठेवून हाती घड्याळ बांधण्याचा निश्‍चय केला आहे. सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा महापौर आणि पुढे कोठेंना आमदारकी, असेच राजकीय समिकरण ठरल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सर्व जातीय समिकरणांसह तुल्यबळ नाराजांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचा महापौर करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आल्याचेही बोलले जात आहे. 

तरीही, निवडणुकीनंतर राष्ट्रवादी व शिवसेनेला सर्वाधिक मताधिक्‍य मिळाल्यास ते दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करू शकतात, असाही राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सावध भूमिका घेत महाविकास आघाडीसाठी आम्ही तयार आहोत, पण सन्मान मिळावा, अशी माफक अपेक्षा व्यक्‍त केली आहे.


महेश कोठेंनी दाखविले खंत पूर्ण करण्याचे स्वप्न...


पक्षाची स्थापना झाल्यापासून सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापौरपद मिळविता आलेले नाही. कॉंग्रेसच्या बरोबरीने अथवा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला नेहमी उपमहापौरपद हेच आले. ही खंत पूर्ण करण्याचे स्वप्न महेश कोठे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दाखविल्याची चर्चा आहे. महेश कोठे यांनी राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांबरोबरील वाद मिटवून आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला सुरुवात केली आहे. 


कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम या पक्षातील त्यांचे जवळचे मित्र आपल्यासोबत घेण्याची रणनिती त्यांनी तयार केली असून प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्याचा विस्फोट होऊ शकतो. काहीही झाले तरी, पवारसाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करून महापौर राष्ट्रवादीचाच बसविण्याचे नियोजन कोठेंनी केल्याचीही चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments