सह्याद्री एक्स्प्रेससह सहा एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द
मिरज : भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्स्प्रेससह कोल्हापूर-मनगुरू, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट या एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द झाल्या आहेत, तर कोल्हापूर-पुणे, मिरज-हुबळी, मिरज-परळी, मिरज-कॅसलरॉक या पाच पॅसेंजर एक्स्प्रेस होणार आहेत.
रेल्वेच्या नवीन धोरणानुसार केवळ हंगामामध्ये फुल्लं व इतरवेळा तोट्यात धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस व पॅसेंजर रद्द करण्यात येत आहेत. याबाबत रेल्वेने अधिकृत घोषणा केली नसली तरी कोविड साथीमुळे मार्च २०२०पासून बंद केलेल्या या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती मिळाली. यापुढे फक्त १५० किमीपर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार आहे.
यापुढे, १५० कि.मी.च्या पुढे धावणाऱ्या पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे. त्यानुसार कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-परळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक पॅसेंजरचा एक्स्प्रेसमध्ये विस्तार होणार आहे.
रेल्वेच्या नवीन धोरणाप्रमाणे एखाद्या मार्गावर गाडी १२ महिने फुल्ल धावत असेल तर त्या मार्गावर एक नवी हमसफर सुरू होईल. त्यानुसार पुढील काळात इंटरसिटी, हमसफर, वंदे भारत, दुरान्तो व संपर्कक्रांती यांसारख्या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यावर भर असणार आहे.
मिरज-सोलापूर एक्स्प्रेसचा विस्तार करून कोल्हापूर-गुलबर्गा एक्स्प्रेस, बेळगाव-पुणे इंटरसिटी, मिरज-मंगळुरू महालक्ष्मी एक्स्प्रेस, बंगळुरू- ह.निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस व्हाया मिरज, कुर्डुवाडी, वास्को-ह.निजामुद्दीन गोवा हमसफर एक्स्प्रेस, यशवंतपूर-ह.निजामुद्दीन हमसफर एक्स्प्रेस या सहा नवीन गाड्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
वंदे भारत सुरू करण्याची मागणी
यापूर्वी सुरू करण्यात आलेली गोवा दिल्ली साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस बंद झाली असून, आता पुन्हा गोवा-दिल्ली हमसफर एक्स्प्रेस नियमित सुरू होणार आहे. या नवीन गाड्यांसोबत कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वेप्रवासी सेनेचे किशोर भोरावत यांनी केली आहे.

0 Comments