सोलापूर जिल्ह्यात खंडणीचा सिनेस्टाईल थरार !
बार्शी : स्टोन क्रशर व्यावसायिकाला सिनेमा स्टाईलने खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून बार्शी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अजूनतरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे परंतु बार्शी येथे अशी एक घटना घडली आहे की ही घटना महाराष्ट्रातील आहे की बिहारमधील आहे अशी शंका यावी. विशेष म्हणजे या खंडणी प्रकरणाचा गुपचूप घेतलेला एक व्हिडीओ समोर आला असून यातून घडलेल्या घटनेचे चित्रण पाहायला मिळू लागले आहे. खंडणीखोरांनी स्टोन क्रशर व्यावसायिकाला पाच लाख रुपयांची खंडणी मागितली आहे आणि यावेळी दोघात परस्परांची गच्ची पकडण्याचीही घटना घडली आहे.
बार्शीच्या ताड सौंदणे येथील रहिवाशी असलेले सुनील भराडिया हे व्यावसायिक आपल्या कार्यालयात बसले असताना दोन व्यक्ती त्यांच्या कार्यालयात घुसतात आणि थेट खंडणीचे मागणी करतात. भराडिया यांनी नकार देताच प्रसंग हातघाईवर आला आणि दोघांनीही परस्परांची गच्ची पकडण्याची घटना घडली आहे.
खंडणीखोरानी स्टोन क्रशर व्यावसायिक भराडिया यांना पन्नास हजार रुपयांचा दरमहा हप्ता देण्याची मागणी केली. या संपूर्ण घटनेचे चित्रण गुपचूपणे करण्यात आले असल्याने नेमका घडलेला प्रसंग थेट अनुभवता येऊ लागला आहे. या घटनेने मात्र व्यापारी आणि व्यावसायिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बार्शीसारख्या ठिकाणी बिहार सारखी परिस्थिती थेट अनुभवाला आल्याने व्यावसायिकात चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. हिंदी चित्रपटात पाहावे असे खंडणीचे दृश्य बार्शी येथे प्रत्यक्षात साकार झाले आहे.
पाच लाखांची खंडणी मागत दरमहा पन्नास हजाराचा हप्ता देण्याची मागणी या खंडणीखोरांनी व्यावसायिक भराडिया यांच्याकडे केली आहे. खंडणीखोर नेमके कोण आहेत हे समजू शकले नाही परंतु या घटनेचे चित्रणच झाले असून त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. सदर प्रकरणी दोघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून लवकरच याचा छडा लागणार आहे.
बार्शी पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपासास सुरुवात केली असून बार्शी पोलिसांनी दोन टीम या तपासासाठी रवाना केल्या आहेत.
यातील एक टीम टेंभुर्णी येथे पाठविण्यात आली आहे तर दुसरी टीम सोलापूरला या आरोपींच्या शोधात गेली आहे. गुन्हेगारीबाबत अलीकडे बार्शीचे नाव देखील आघाडीवर येताना दिसत आहे. नुकतेच मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण बार्शीत उघडकीस आले आणि राज्यभर बार्शी आणि विशाल फटे हे नाव चर्चिले गेले आहे.
या प्रकरणाची अद्याप चर्चा सुरु असताना खंडणीचा हा प्रकार समोर आला आहे. अगदी चित्रपट स्टाईलने दोघे थेट कार्यालयात येऊन खंडणीची मागणी करतात त्यामुळे व्यापारी आणि व्यावसायिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

0 Comments