google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलिसाने अठरा वर्षात मिळवली बारा कोटींची मालमत्ता !

Breaking News

पोलिसाने अठरा वर्षात मिळवली बारा कोटींची मालमत्ता !

 पोलिसाने अठरा वर्षात मिळवली बारा कोटींची मालमत्ता !


मुंबई : पोलीस खात्यातील एका कर्मचाऱ्याने अठरा वर्षांच्या सरकारी सेवेत तब्बल बारा कोटीहून अधिक रकमेची मालमत्ता जमवली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून पोलीस खात्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. 


राज्य शासनाच्या जवळपास सगळ्याच विभागात कमी अधिक भ्रष्टाचार सुरु असतो पण पोलीस आणि महसूल विभाग हे या पापात सतत आघाडीवर आहेत आणि सर्वसामान्य माणसाला वेठीस धरून हा भ्रष्टाचार करण्यात येतो.  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात पोलीस आणि महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी अधिक प्रमाणात अडकलेले सतत पाहायला मिळतात. 


महसूल विभागात तलाठ्यापासून उप जिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यापर्यंत आणि पोलीस विभागात पोलीस शिपायापासून उप विभागीय अधिकारी यांच्यापर्यंत लाचेच्या जाळ्यात अडकलेले आहेत.  काही आयपीएस अधिकारी यांच्या घरात डोळे दिपून जातील एवढी माया उजेडात आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. 


अठरा वर्षे पोलीस दलात काम केलेल्या कर्मचाऱ्याकडे बारा कोटींपेक्षा अधिक रकमेची मालमत्ता आढळल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सशस्त्र पोलीस दलात सेवेत असलेल्या पोलीस नाईक सुरेश बामणे याच्याकडे तब्बल १२ कोटी ६५ लाख ६३ हजार ९६६ रुपयांची मालमत्ता जमविली असल्याचे निष्पन्न झाले आहे.


 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस नाईक आणि त्याची पत्नी लता बामणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून ही मालमत्ता उघडकीस आली आहे.  अठरा वर्षे नोकरीत असलेल्या या पोलिसाने कोट्यवधिंची मालमत्ता जमविल्याचे पाहून अनेकांचे डोळे विस्फारले गेले आहेत. 


सशस्त्र पोलीस दलात नायगाव येथे कार्यरत असलेल्या या पोलिसाने २००० ते २०१८ या काळात ही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नापेक्षा १ हजार ५१२ टक्के अधिक असल्याचे तपासात आढळून आले आहे. या मालमत्तेबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली पण त्याला या मालमत्तेचा हिशोब देता आला नाही 


त्यामुळे त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पत्नीने देखील त्याला सहकार्य केलेले असल्याने तिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

Post a Comment

0 Comments