ब्रेकींग: महाराष्ट्र संपूर्ण अनलॉक होणार? ‘हे’ निर्बंध हटणार, आरोग्यमंत्री म्हणाले…
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. आता देशातील इतर राज्यांपैकी महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची नोंद कमी होत चालली आहे. पुढच्या आठवड्याभरात नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण होत आहे. दररोजची रुग्ण संख्याही कमी असल्याने लवकरच महाराष्ट्रातील सध्याचे निर्बंध शिथिल होणार आहेत, असे संकेत राजेश टोपेंनी दिले आहेत.
काय म्हणाले राजेश टोपे?
“सध्या महाराष्ट्रात सहा हजारांच्या आसपास नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. काही दिवसांपूर्वी दिसणारा कोरोनाचा वाढता आलेख हा आता उतरताना दिसत आहे. त्याबद्दल आपल्याला निश्चित प्रकारे मनापासून समाधान आहे. त्यामुळे यापुढच्या काळात कोणत्याही जाचक गोष्टी राहणार नाहीत. ज्या आहेत, त्या हळूहळू कमी होतील,’ असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.
बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. “कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीअखेर नाट्यगृह, सिनेमागृह 100 टक्के क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय हॉटेल, बार, रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याकडे कल राहिल”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आता हळूहळू का होईना पण आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या संकेतामुळे जे काही राज्यात निर्बंध होते ते हटणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. म्हणून फेब्रुवारी महिन्यातील अखेरच्या आठवड्यात राज्यातील निर्बंध संपूर्णपणे हटणार का याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईसह राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहं, नाटय़गृहं, थीम पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली होती. तर, कुठे सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये 200 जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली होती.
याशिवाय स्थानिक प्रशासनालाही परिस्थीतीनुसार निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळं निर्बंध आणखी शिथिल करुन राज्यातील जनतेला आणखी मोकळीक राज्य सरकारकडून दिली जाण्याची शक्यता आहे. यासंबंधी लवकरच निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत.

0 Comments