परीक्षेसाठी एका वर्गात 25 विद्यार्थी! मुख्याध्यापकांना द्यावे लागणार हमीपत्र
कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी-बारावीची परीक्षा घेतली जात आहे. आता 'शाळा तिथे परीक्षा केंद्र' आहेत. त्या केंद्रांवर तथा उपकेंद्रांवर एका वर्गात 25 विद्यार्थीच असतील.
सोलापूर : कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी-बारावीची परीक्षा घेतली जात आहे. आता 'शाळा तिथे परीक्षा केंद्र' असणार आहेत. त्या केंद्रांवर तथा उपकेंद्रांवर एका वर्गात 25 विद्यार्थीच असतील. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील (परीक्षा केंद्र) सोयी-सुविधांबद्दल मुख्याध्यापकांना हमीपत्र द्यावे लागेल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झाली असून 3 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. त्यानंतर 4 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत त्यांची लेखी परीक्षा होईल. तत्पूर्वी, दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत चालेल. 15 मार्चपासून सुरु झालेली दहावीची लेखी परीक्षा 18 एप्रिलपर्यंत चालणार आहे. बोर्डाकडून आता परीक्षा केंद्रांची निश्चिती केली जात आहे.
त्याअनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांची, मुख्याध्यापकांची बैठक घेतली जात आहे. महाविद्यालयातील परीक्षार्थी, एकूण बाकांची संख्या, पाण्याची, वीज, पंखा, जनरेटर, इनव्हर्टर, मुला-मुलींची स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय, शिक्षक, लिपिकांची संख्या, मागच्या वर्षी परीक्षेचे मुख्य केंद्र कोणते होते,
याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना द्यावी लागणार आहे. तर शाळांमधील दहावीच्या परीक्षार्थींची संख्या, एकूण बाकांची व वर्गखोल्यांची संख्या, पाण्यासह इतर सोयी-सुविधा, शिक्षक, लिपिकांची संख्या अशा सर्व बाबींची माहिती बोर्डाला कळवावी लागणार आहे. त्यानुसार त्याठिकाणी परीक्षा केंद्र व उपकेंद्र दिले जाणार आहे.
दहावी-बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात १०४४ केंद्रे
मुख्याध्यापकांना द्यावे लागणार हमीपत्र
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रत्येक शाळांमध्ये केंद्र असणार आहे. परीक्षेपूर्वी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. त्यानुसार परीक्षेसाठी माझी शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होऊ शकते.
तसेच केंद्रावरील परीक्षार्थींसाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. परीक्षा घेण्यासाठी कोणतीही अडचण अथवा तक्रार नाही, अशा बाबींचा त्या हमीपत्रात उल्लेख करावा लागणार आहे. राज्यभरात दहावी-बारावी परीक्षेसाठी जवळपास 31 हजार केंद्रे असतील. त्याठिकाणी एकूण 31 लाख 63 हजार विद्यार्थी परीक्षा देतील.
परीक्षा पध्दतीतील बदल...
- शाळा तिथे परीक्षा केंद्र असेल, परीक्षेसाठी नसतील बाह्य पर्यवेक्षक
- विद्यार्थ्यांची अंगझडती होणार नाही, शेजारील शाळेचा एक शिक्षक बैठे पथक म्हणून असेल
- 40 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायला 15 मिनिटांचा तर 80 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटांचा वाढीव वेळ
- प्रत्येक परीक्षा उपकेंद्रावरील एका वर्गात 25 विद्यार्थ्यांच्या बैठकीची करावी सोय

0 Comments