google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शरद पवारांमधील ' साहेब ' सुशीलकुमार शिंदेंमध्येही दिसले , पण ...

Breaking News

शरद पवारांमधील ' साहेब ' सुशीलकुमार शिंदेंमध्येही दिसले , पण ...

 शरद पवारांमधील ' साहेब ' सुशीलकुमार शिंदेंमध्येही दिसले , पण ...


एके दिवशी मुंबईत पुन्हा शरद पवारांची भेट झाली. परिचय वाढला आणि त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. राजकारणात प्रवेश करण्याबद्दल पवारांनी त्यांना विचारले...


सोलापूर : लोकसभेचे नेते, केंद्रात गृह व ऊर्जामंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि सलग नऊवेळा महाराष्ट्राचे अर्थमंत्री अशी मोठी पदे भूषवूनही सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या स्वभाव आणि वर्तनात कोणताही बदल होऊ दिला नाही.त्यामुळे त्यांचे 'साहेब'पण  जनमानसात आजही कायम आहे. मात्र, तिसऱ्यांदा आमदार होऊनही मंत्रिपदाने हुलकावणी दिलेल्या प्रणिती शिंदे यांना ते 'साहेब'पण कधी येणार आणि ताई 'साहेब' कधी होणार, अशी खदखद सच्चा कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनात आहे. 



सुशीलकुमार शिंदे यांचे बालपण ते राजकारण असा पूर्वजीवनाचा प्रवास खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेल्याने त्यांनी आठवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात  शिरस्तेदाराची (पट्टेवाला) नोकरी केली. 



एकीकडे शिरस्तेदाराची नोकरी करताना दुसरीकडे शाळा सुरू ठेवली. नोकरी करतानाच त्यांनी शाळेतील नाटकातही काम केले. न्यायालयात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांना लिपिकपदी बढती मिळाली. बीए पूर्ण केल्यानंतर पूर्वीच्या नोकरीचा राजीनामा देऊन कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांनी पुणे गाठले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिकताना त्यांनी विद्यार्थी चळवळीत सहभाग घेतला. 



वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी भेट झाली. काकासाहेब गाडगीळ यांनीही त्यांना मदत केली. त्यावेळी वर्तमानपत्रातील पोलिस उपनिरीक्षकपदाची जाहिरात पाहिली आणि त्या परीक्षेत त्यांनी यश मिळविले. मुंबईतील सीआयडी विभागात नोकरी करत असतानाच त्यांनी एलएलबीचे शिक्षणही पूर्ण केले. पोलिस निरीक्षक असताना त्यांचा राज्यकर्त्यांशी नेहमी संबंध यायचा.



एके दिवशी मुंबईत पुन्हा शरद पवारांची भेट झाली. परिचय वाढला आणि त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. राजकारणात प्रवेश करण्याबद्दल पवारांनी त्यांना विचारले. त्यानंतर त्यांनी प्रदेश कॉंग्रेस कमिटीवर काम केले. तत्पूर्वी, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. 



पवारांनी पुढे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांना तयार केले. परंतु, सोलापूर (करमाळा तालुका) मतदार संघातून तिकीट मिळाले नाही. मात्र, पुढे त्या मतदारसंघाचे आमदार ताराप्पा सोनवणे यांचे आकस्मित निधन झाले आणि पोटनिवडणूक लागली. त्यावेळी शिंदेंना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. 1973 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 



तिथून त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मागे वळून पाहिले नाही. परंतु, त्यांना लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभवाचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी स्वत:मधील साहेबपण जोपासत अनेकांना मदत केली. भाजपच्या नवख्या उमेदवारांकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यांनी टिकवलेली पक्षसंघटनेची घडी सध्या विस्कटू लागल्याची स्थिती आहे.


तरीही, मतदारांची ताईंनाच पसंती...


2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत साहेबांना मोहोळ पंढरपूर , दक्षिण सोलापूरसह  इतर मतदार संघातून चांगले मताधिक्‍य मिळाले. परंतु, आमदार प्रणिती ज्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात, त्याच मतदारसंघात त्यांना फटका बसला. पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांचे साहेबपण आवडले, 



मात्र जनतेला आमदार प्रणितींमधील ताईच आवडली. दरम्यान, आता सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या नेत्या प्रणितीच असल्याचे स्पष्ट केले. मात्र, ज्या कॉंग्रेसमधील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना प्रणिती शिंदे यांच्यातील साहेबांचे 'साहेब'पण दिसले नाही, ते आता पक्षाला रामराम ठोकू लागल्याची स्थिती आहे.


पवारांमधील 'साहेब' सुशीलकुमार शिंदेंमध्येही दिसले



राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ज्या ठिकाणी दौरा करतात, त्या ठिकाणी सर्वसामान्य मतदारांमधील अनेकांना ते नावानिशी ओळखतात. त्यांचा तोच गुण सुशीलकुमार शिंदेंमध्येही पाहायला मिळाला आणि म्हणूनच त्यांनाही लोक आजही आदराने साहेब म्हणतात. त्यांच्या मोबाईलवर कोणीही कॉल केल्यास ते आवर्जून घेतात. समोरील व्यक्‍तीने ओळख सांगितल्यानंतर त्या ठिकाणची ओळख ते आवर्जून त्या व्यक्‍तीला सांगतात. मात्र, आमदारकीची हॅट्ट्रिक केलेल्या प्रणितींना अजून मंत्रिपद मिळायचे आहे, तोवरच ते ना कॉल घेतात ना आलेल्या कॉलला प्रतिसाद देतात, अशी चर्चा आहे.




ताईंकडे नको पण साहेबांकडे तरी बघा...

सुशीलकुमार शिंदेंनी राजकीय क्षेत्रात अनेकांना मोठी संधी दिली. उद्योग, व्यवसायासाठीही अनेकांना मदत केली. त्यांची मदत आजही कोणीच विसरलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे, प्रिया माने यांनी अजूनपर्यंत पक्ष सोडल्याचे स्पष्ट केले नाही.



 परंतु, कॉंग्रेसमधील त्यांचा दुरावा, त्यांच्या मनातील खदखद ओळखून राष्ट्रवादीतील नेत्यांनी त्यांच्या पक्षांतरासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचवेळी कॉंग्रेसमधील काही ज्येष्ठ आजी-माजी पदाधिकारी त्यांना म्हणाले, प्रणितीताईंकडे लक्ष देऊ नका, साहेबांकडे पाहून तरी पक्ष सोडू नका, असेही बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments