मामा,आम्हाला वाचवा...,सोलापूरकर का देत आहेत पालकमंत्री भरणे यांना हाक
सोलापूर : परिवहन आयुक्तालयाने काढलेल्या नव्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर आता वाढीव दंडानुसार कारवाई होणार आहे. सहा दिवसांच्या समुपदेशनानंतर आता सोमवारपासून दररोज बेशिस्तांवर कडक कारवाई केली जात आहे. विनालायसन्स (Driving License) वाहन चालविणाऱ्याला तब्बल पाच हजारांचा तर हेल्मेट नसल्यास पाचशे रुपयांचा दंड आणि त्या दुचाकीस्वाराचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. दंडाची रक्कम रोखीने किंवा ऑनलाइन पद्धतीने जागेवरच भरावी लागणार आहे.
पालकमंत्री भरणे मामा आपण काही दिवसांपूर्वी पत्रकार संघाच्या एका कार्यक्रमात पोलीस आयुक्तांना सांगितले होते, आमचे सोलापूरकर कामगार, कष्टकरी, मोल मजुरी करणारे, हातावर पोट असणारे आहेत, त्यामुळे कारवाई करताना काळजी घ्या, त्रास देऊ नका, अशा सूचना (एकप्रकारे विनंती) केल्या होत्या.
मात्र तुमच्या सूचनेचा पोलीस प्रशासनाने कोणताही विचार केला नाही, आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सोलापुरात नवीन पोलीस आयुक्त आले की हेल्मेटची सक्ती होते, त्यानंतर प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधीनी विरोध केला की, सक्ती मागे घेण्यात येते हा इतिहास आहे.
पोलीस आयुक्त हरीश बैजल हे शिस्तप्रिय आहेत, वाहतूक व्यवस्था सुधारण्याकडे त्यांचा सर्वाधिक कल आहे. मात्र सोलापूर शहरातील रस्त्यांची वाईट अवस्था आहे, सोलापूर नव्हे खड्डेपुर म्हणून ओळखले जाते, असा कोणता रस्ता नाही की त्यावर खड्डे नाहीत, त्यामुळे प्रथम रस्ते सुधारले पाहिजेत, हेल्मेट सक्ती ही शहराच्या बाहेर हायवेवर करायला हवी, ती गरज आहे.
भरणे मामा, तुम्ही एकतर आता महिन्यानंतर सोलापुरात येत आहात, निश्चितच तुमच्याकडून पोलीस प्रशासनाने केलेल्या हेल्मेट सक्ती वर निर्णय अपेक्षित आहे.
0 Comments