कोरोना लसीचा आणखी एक चमत्कार, बोबड्याला फुटली वाचा !
झारखंड : कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत अनेकांचे गैरसमज असताना पुन्हा एकदा एक चमत्कारिक घटना समोर आली असून बोबडी वळलेल्या व्यक्तीस कोरोना लसीमुळे मुळचा आवाज पुन्हा प्राप्त झाला आहे.
कोरोना लसीबाबत अफवा आणि गैरसमज असल्यामुळे आजही अनेकजण मोफत आणि जीवरक्षक असलेली लस घ्यायला तयार नाहीत. असे असले तरी लस घेतल्यानंतर आपल्या जुनाट व्याधी बऱ्या झाल्याचा दावा अनेकांनी केला आहे. जुन्या व्याधीवर अनेकवेळा उपचार करून आराम मिळाला नव्हता पण कोरोना लस घेतली आणि हा जुना आजार बारा झाला असल्याचे अनेक दावे समोर आले आहेत. असे असताना कोविशिल्ड लस घेतल्यानंतर एका बोबड्या व्यक्तीचा आवाज पूर्ववत झाला असल्याची माहिती समोर आली आहे आणि पुन्हा एकदा आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.
दुलारचंद मुंडा या ५५ वर्षे वयाच्या व्यक्तीच्या जीवनात नव्याने आनंद भरण्याचे काम या लासीने केले आहे. झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील सलगाडीह गावातील ही चमत्कारिक घटना पुढे आली आहे. दुलारचंद मुंडा हे पाच वर्षापूर्वी एका अपघातात गंभीर जखमी झाले होते आणि त्यांचे शरीर काम करण्यास साथ देत नव्हते. त्यांची बोबडी वळलेली होती आणि ते अपघातापासून एक जागी पडून होते. त्यांना बोलताही येत नव्हते. त्यांच्या कुटुंबात ते एकटेच कामावणारे होते आणि ते एका जागी जमिनीला खिळून होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब मोठ्या संकटात सापडले होते.
मुंडा यांना त्यांच्या घरी जाऊन ४ जानेवारीला कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली आणि ५ जानेवारीपासून त्यांचे शरीराने हालचाल करायला सुरुवात केली. पाच वर्षे एक जागी पडून असलेले मुंडा हालचाल करू लागले होते. मुंडा यांना मणक्याची समस्या होती. असे वैद्यकीय अधिकारीकेरकट्टा यांनी सांगितले. सिव्हिल सर्जन डॉ. जितेंद्रकुमार यांनी मात्र ही आश्चर्यकारक घटना असल्याचे सांगितले आहे.
अकरा वेळा लस !
कोरोना एवढा विनाशकारी असून असंख्य लोकांनी अजूनही लसीकारणाकडे पाठ फिरवली आहे तर दुसरीकडे एका आजोबाने ११ वेळा लस घेतली म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेंव्हा कोरोनावर काहीच उपाय नाही म्हणून चिंता व्यक्त केली जात होती . अभ्यासकांनी दिवसरात्र परिश्रम करून कोरोनाला प्रतिबंध करणारी लस शोधून काढली आणि शासनाने ती जनतेसाठी मोफत खुली केली.
सुरुवातीच्या काळात लसीचा तुटवडा होता तेंव्हा लसीकरण केंद्रावर रांगा लागत होत्या आणि आता मुबलक लस उपलब्ध असताना असंख्य लोक लस घ्यायला तयार नाहीत. लसीबाबत अनेकांचे अनेक गैरसमज आहेत तसे अनेकांनी अनेक दावेही केलेले आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर काही जणांच्या अन्य व्याधी देखील ठीक झाल्याचे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे ही लस सतत कुठल्यातरी कारणाने वेगळ्या चर्चेत राहिली आहे. असे असतानाच बिहारमधील एका ८४ वर्षाच्या वृद्धाने ११ वेळा ही लस घेतली आणि बाराव्या वेळी लस घेण्यास आले तेंव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.
लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी होते आणि अशा नोंदणीमुळे अधिकवेळा लस घेताच येत नाही पण या आजोबांनी शक्कल लढवली आणि प्रशासनालाही टोपी घालत तब्बल अकरा वेळा कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. मधेपुरा येथील ब्रह्मदेव मंडल या ८४ वर्षे वयाच्या आजोबांनी दहा महिन्याच्या कालावधीत ११ वेळा लस घेतली पण प्रशासनाला याचा थांगपत्ताही लागला नाही.
त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही लस घेतली आणि १२ व्या वेळी लस घेण्यासाठी गेले त्यावेळी लस संपली आणि त्यांनी अकरा वेळा लस घेतल्याचे भांडे फुटले. पण त्यांनीही सांगितले, ही लस म्हणजे एक अमृत आहे ! त्यानंतर आता हा आणखी एक चमत्कार समोर आला आहे. या आजोबांना अटक झाली असली तरी लसीकरण किती आवश्यक आहे याचा संदेश मात्र दिला आहे.
0 Comments