बार्शीचा "बिग बुल" | शेअर बाजार घोटाळयाचा आकडा 11 कोटीच्या वर ; फटेच्या 'विशाल'फसवणुकीने सर्वच चक्रावले
बार्शी : गेल्या चार दिवसापासून चर्चेत असलेल्या शेअर बाजार लिंक्ड कोट्यावधी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी अखेर विशाल अंबादास फटे आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा भा.दं.वि. कलम 34, 409,417, 420 व महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 च्या कलम 3 अन्वये गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. मुख्य आरोपी विशाल याच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या कामात सहकार्य करणार्या दिपक बाबासाहेब अंबारे (रा. शेळके प्लॉट, गाडेगांव रोड, बार्शी) यानेच याबाबत फिर्याद दिली आहे.
फसवणूकीचा प्रारंभिक आकडा 5 कोटी 63 लाख 25 हजार असला तरी तो अब्जावधी रुपयामध्ये जाण्याची शक्यता आहे. ज्यांना आपला आर्थिक स्त्रोत सांगण्यामध्ये अडचणी आहेत, अशा अनेक व्यक्तींनी अजूनही पोलिसांकडे रितसर तक्रार दिलेली नाही. मात्र या प्रकरणात काय होते याकडे ते लक्ष ठेवून आहेत.
विशालची पत्नी राधिका, वडिल अंबादास, आई अलका, भाऊ वैभव यांना सहअरोपी करण्यात आले आहे. तर फिर्यादीने आपली 96,25,000 रु, भाऊ किरण बाबासाहेब अंबारे याची 50,00,000 रु, मित्र संग्राम दिलीप मोहिते याची 3,60,20,000 रु, रोहित सूर्यकांत व्हनकळस याची 35,00,000 याची, सुनिल सुरेश जानराव याची 20,00,000रु, हणुमंत सुभाष ननवरे याची 2 लाख रुपयाची फसवणूक केल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान फसवणुकीमुळे क्षुब्ध झालेल्या गुंतवणुकीदारांनी विशालच्या अलिपूर रस्त्यावरील घरी व उपळाई रस्त्यावरील कार्यालयात जाऊन तेथील वस्तूंची तोडफोड केली. आज शुक्रवारी दिवसभरात आणखी 36 लोकांनी दिलेल्या माहितीवरून फसवणुकीचा आकडा 11 कोटी 36 लाखावर गेला आहे. विशाल देशाबाहेर पळून जावू नये म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच त्याचे आई-वडिल-भाऊ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी अनेक पथके तयार केली असून ती त्याच्या मागावर आहेत. तो लवकरच पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहे.
विशालचे वडिल अंबादास फटे हे येथील भगवंत प्रसाद सुलाखे वाणिज्य महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक आहेत. विशालने प्रारंभी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रस्त्यावरील मोहिते कॉम्प्लेक्समध्ये नेट कॅफे सुरु केले होते. तेथेच दिपकची त्याच्यासोबत ओळख झाली. प्रारंभी विशाल शेअर बाजारात ट्रेडिंग करत होता. त्याचे क्लासेस घेत होता. तेथे प्रचंड नफा होत असल्याचे तो सर्वांना सांगत असे. त्यामुळे फिर्यादी सह अनेकजण त्याच्याकडे आकर्षिले गेले.
विशालने शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी अलका शेअर्स सर्व्हिसेस, विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड, जे.एम. फायनान्शियल सर्व्हिसेस अशा कंपन्या काढल्या होत्या. त्याच्या घरातील लोकच या कंपन्यामध्ये भागीदार होते. या कंपन्याच्या वेगवेगळ्या बँकेमध्ये काढलेल्या खात्यामध्ये आणि रोख, चेकव्दारे तो लोकांकडून रकमा स्वीकारत होता. मोठा परतावा देण्याचे आमिष तो दाखवित होता. दिर्घकाळ त्याने आर्थिक देवाण घेवाण दिपकच्या खात्यातून केली. त्याचे व्यवहार जवळून बघत असल्यामुळे दिपकचा त्याच्यावर विश्वास बसल्याने त्याने आपले नातेवाईक, मित्र अशा अनेक लोकांना विशाल कडे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
विशालने आकर्षक लाभाच्या वेगवेगळ्या योजना काढल्या आणि त्यात लोकांना भरमसाठ परतावाही दिला. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरील विश्वास वाढतच गेला. नोव्हेंबर महिन्यात झी हिंदुस्थान यांचे वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे हस्ते बेस्ट टेक्नॉलाजी डेव्हलपमेंट इन अल्गो ट्रेडिंग इन इंडिया हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळेही लोकांचा त्यावरील विश्वास वाढला. त्यातून लोकांनी मिळेल त्या मार्गाने पैसे जमवून त्याच्या हवाली केले.
10 लाखाचे वर्षानंतर 6 कोटी देण्याच्या त्याच्या योजनेने सर्वाधिक पैसे त्याने मिळविले. या योजनेतील सर्व पैसे त्याने रोख स्वरुपातच घेतले आहेत. त्याने जी.एम. फायनान्स सर्व्हिसेस नावाच्या प्रस्थापित कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे येथील खाजगी बँकेत खाते उघडले होते. त्यामध्येही अनेक गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते.
मात्र मूळ कंपनीला त्याचा हा उद्योग माहित झाल्यानंतर त्यानी तक्रार करुन हे खाते बंद करायला लावले होते. गेल्या शुक्रवारी 7 जानेवारी रोजी पुणे येथील मामाला ऍटक आल्यामुळे त्यांना भेटण्यास जात आहे. असे सांगून विशालने बार्शी सोडली. त्यानंतर 9 तारखेला त्याचा मोबाईल बंद झाला. त्यानंतर त्याचा कसलाच संपर्क झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
बार्शी शहरातील नागरिकांची अधिक व्याज देतो असे सांगून फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणातील विशाल अंबादास फटे यांची पाच बँकातील खाती पोलीसांनी बँकांना पत्र देवून गोठवली आहेत. दरम्यान यात फसवणूक झालेले अनेकजण पुढे येत असून आज बार्शी पोलीस ठाण्याकडे तक्रारदारांची गर्दी झाली होती.
विशाल फटे यांनी अलका शेअर्स नावाची मार्केटींग कंपनी स्थापन केली. या कंपनी मार्फत गुंतवणूकदारांना अधिक व्याज देण्याचं सांगत पुढील तारखेचा चेक आणि स्टॅम्पवर परतावा देण्याबाबत लिहून देत असे. यात अनेक जणांनी लाखो रुपये गुंतवणूक संख्या 600 च्यावर असल्याचं दिसून येत आहे. पोलीसांनी विशाल फटे यांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर तपास सुरु केला. त्यांना हुडकलं, सापडले नाही, मोबाईल बंद होता तेंव्हा त्यांची खाती बँकांकडून सील करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
0 Comments